अंबाबाई मंदिराबाहेर कुणीही या... पूजेचे साहित्य मांडा; महापालिकेचे झोपेचे सोंग, हाणामारीने गालबोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:36 IST2026-04-10T13:36:48+5:302026-04-10T13:36:56+5:30

महापालिकेने झोपेचे सोंग घेऊन या अतिक्रमणांना जणू अभयच दिले आहे.

anyone outside Ambabai temple put up worship materials municipal corporation pretending to sleep | अंबाबाई मंदिराबाहेर कुणीही या... पूजेचे साहित्य मांडा; महापालिकेचे झोपेचे सोंग, हाणामारीने गालबोट

अंबाबाई मंदिराबाहेर कुणीही या... पूजेचे साहित्य मांडा; महापालिकेचे झोपेचे सोंग, हाणामारीने गालबोट

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला चोहोबाजूंनी पूजा साहित्यांच्या स्टॉलचा विळखा पडला आहे. कुणीही या, कुठेही टेबल मांडा आणि साडी, ओटीसह पूजेचे साहित्य विका, त्यावर ना कुणाचे निर्बंध ना कुणाचा धाक, देवस्थान समिती म्हणते, दरवाजांबाहेर आम्ही कारवाई करू शकत नाही. महापालिकेने झोपेचे सोंग घेऊन या अतिक्रमणांना जणू अभयच दिले आहे. त्यामुळे उघडउघड नारळ फेकून डोकेफोडी झाली, परस्थ भाविकांसमोर शहर, मंदिराचा अपमान झाला तरी कुणाला काही देणे घेणे नाही.

दोन दिवसांपूर्वी जोतिबा रोड येथे पूजेचे साहित्य विकण्यावरुन दोन विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. अगदी एकमेकांच्या डोक्यात नारळ फेकून मारण्यात आले. एवढे घडल्यानंतरही येथील विक्रेत्यांवर, अतिक्रमणधारकांवर ना महापालिकेने कारवाई केली ना पोलिसांनी. अंबाबाई मंदिर शहराच्या मध्यवस्तीत असल्याने भोवतीने सर्वत्र बाजारपेठ आहे. त्यातच कमी आहे की काय म्हणून चारही दरवाजांना लागून पूजा साहित्य विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. 

मंदिराच्या आत देवस्थान समिती कारवाई करू शकते, पण बाह्य परिसर महापालिकेच्या अखत्यारित असल्याने देवस्थान हस्तक्षेप करू शकत नाही. महापालिका अतिक्रमणांवर कारवाई करत नाही ही मोठी अडचण आहे. या विक्रेत्यांवर कुणाचेही अंकुश नाही. त्यामुळे कोणीही येतो, कुठेही साहित्य विक्रीचे स्टॉल मांडतो आणि व्यवसाय करतो.

मंदिराबाहेर हाणामारी शरमेची बाब

भाविकांना बोलवून बोलवून साहित्य देणे, अर्ध्या साडीत कागद भरून भाविकांची फसवणूक करणे, त्यांच्याकडून जास्त स्क्कम उकळणे हे नित्याचेच झाले आहे. त्यात जोगती, परड्या घेऊन बसणाऱ्या महिला भाविकांकडून पैसे मागतात. आता विक्रेत्यांमध्ये भाविकांदेखत मारामारी झाली. ही शहराच्या आणि अंबाबाई मंदिराच्या नावलौकिकाला बाधा आणणारी गोष्ट आहे याचे विक्रेत्यांनी भान राखणे गरजेचे आहे.

मंदिराबाहेरील परिसरात देवस्थान समिती कारवाई करू शकत नाही. महापालिकेने हे करणे अपेक्षित आहे. त्यासाठी कायम पत्रव्यवहार करून आठवण करून दिली जाते. इथे कायमस्वरूपी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करून अतिक्रमणांवर बंधने आणली पाहिजेत. - शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती.
 

Web Title : अंबाबाई मंदिर के बाहर अराजकता: अवैध स्टॉल, लड़ाई से कलंकित।

Web Summary : अंबाबाई मंदिर अवैध स्टॉलों से घिरा हुआ है। अधिकारियों की निष्क्रियता से विक्रेताओं की हिंसा, भक्तों और मंदिर की प्रतिष्ठा का अनादर हो रहा है। कार्रवाई जरूरी है।

Web Title : Chaos outside Ambabai temple: Illegal stalls, fights mar sanctity.

Web Summary : Ambabai temple besieged by illegal stalls. Authorities' inaction leads to vendor violence, disrespecting devotees and the temple's reputation. Action is needed.