Kolhapur: प्रांताधिकाऱ्यांच्या नावे वकिलाने घेतली लाच, २५ हजार रुपये घेताना 'लाचलुचपत'ने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:44 IST2025-09-26T11:42:31+5:302025-09-26T11:44:47+5:30
'प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झालीच नव्हती'

Kolhapur: प्रांताधिकाऱ्यांच्या नावे वकिलाने घेतली लाच, २५ हजार रुपये घेताना 'लाचलुचपत'ने पकडले
कोल्हापूर : तक्रारदारांच्या मिळकतीवरील ब सत्ता प्रकार कमी केल्याचा करवीर प्रांताधिकाऱ्यांचा आदेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकील विनायक सुरेश तेजम (वय ३७, रा. मंजुळा अपार्टमेंट, शाहूपुरी, कोल्हापूर) याने तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या नावे लाच उकळल्याप्रकरणी ॲड. तेजम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.२५) सायंकाळी महालक्ष्मी चेंबर येथे ॲड. तेजम याच्या कार्यालयात झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी ॲड. तेजम याच्यामार्फत त्यांच्या कोल्हापुरातील मिळकतीचा ब सत्ता प्रकार बदलण्यासाठी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या कामासाठी ॲड. तेजम याने तक्रारदारांकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने अर्ज करताच त्याची पडताळणी करून सापळा रचला असता, ॲड. तेजम हा २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.
याबाबत त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने कारवाई केली.
'प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झालीच नव्हती'
कामाचे शुल्क म्हणून ॲड. तेजम याने तक्रारदारांकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रांत कार्यालयात एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून २५ हजार रुपये स्वीकारले. प्रांत कार्यालयातून पैशांची मागणी झाली होती काय ? याची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, यात तथ्य आढळले नाही, अशी माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली.