गडहिंग्लज कारखाना गैरव्यवहार प्रकरण: डॉक्टर प्रकाश शहापूरकर तुम्हीसुद्धा..!; सभासद, शेतकरी, कामगारांतून संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:25 IST2024-12-14T15:25:25+5:302024-12-14T15:25:46+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने अंतर्गत हिशेब तपासणी व मार्गदर्शनासाठी नेमलेल्या लेखापरीक्षकाकडूनच माजी ...

गडहिंग्लज कारखाना गैरव्यवहार प्रकरण: डॉक्टर प्रकाश शहापूरकर तुम्हीसुद्धा..!; सभासद, शेतकरी, कामगारांतून संतप्त प्रतिक्रिया
राम मगदूम
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने अंतर्गत हिशेब तपासणी व मार्गदर्शनासाठी नेमलेल्या लेखापरीक्षकाकडूनच माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याविरुद्ध अपहार व नुकसान मिळून सुमारे ३० कोटीच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या घटनेमुळे सभासदांसह शेतकरी, कामगारांतून ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ अशा संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत.
१९७२ मध्ये संस्थापक आप्पासाहेब नलवडे व सहकाऱ्यांनी कारखान्याची मंजुरी आणली. परंतु, बहुसंख्य शेतकरी अल्प भू-धारक व कोरडवाहू शेतीमुळे भागभांडवल जमवताना दमछाक झाली. हजारो शेतकऱ्यांनी सोसाट्यांची कर्जे काढून शेअर्स घेतले. काटेवाल्या व्यापाऱ्यांसह अनेकांच्या मदतीमुळे कारखान्याचे स्वप्न सत्यात उतरले. अवघ्या ११ महिन्यात कारखान्याची उभारणी करून शासकीय भागभांडवल परत करण्याचा पराक्रम नलवडेंनी केला.
तथापि, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, राजकुमार हत्तरकी यांनी एकत्र येऊन नलवडेंच्याकडून कारखान्याची सत्ता हस्तगत केली. तेंव्हापासून सुरू झालेल्या आघाड्यांच्या राजकारणामुळेच कारखान्याचे पुरते वाटोळे झाले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सभासदांनी त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे एकहाती सत्ता सोपवली. परंतु, शहापूरकरांच्या कृतीमुळे कारखान्याचे प्रवर्तक व शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
२०२२ मध्ये आर्थिक अडचणीमुळे कारखाना बंद राहिला. गेल्यावर्षी कारखान्याचे नक्तमूल्य उणे असतानाही मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेतून दिलेल्या ५५ कोटींच्या कर्जामुळे कारखाना सुरू झाला. ऊस, तोडणी-वाहतुकीच्या बिलांसाठी ४० लाखाचे साखर तारण कर्जही दिले. परंतु, शहापूरकरांनी कर्जाच्या विनियोगात बँकेचे नियम व सहकार कायद्यालाच बगल दिल्यामुळे ही नामुष्की त्यांच्यावर, पर्यायाने कारखान्यावर ओढवली.
दरम्यान, शहापूरकरांच्या मनमानीमुळे एका वर्षात तीन कार्यकारी संचालकांसह ८ खातेप्रमुखांनी राजीनामे दिले. त्यांच्याच सहकाऱ्यांनी साखर आयुक्तांसह जिल्हा बँकेकडे तक्रारी केल्या. सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनीही वेळोवेळी आवाज उठविला. त्यामुळे मुद्देनिहाय सखोल चौकशी व लेखापरीक्षणातून हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यापुढे पोलिस, सहकार खात्याची कारवाई व न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.
राजीनाम्यानंतर फौजदारीची वेळ..!
अहमदाबाद येथील तथाकथित स्वामी नारायण ट्रस्टकडून ३०० कोटींचे कर्ज आणण्यात झालेली दिरंगाई व थकीत पगारासाठी कामगारांनी संचालकांच्या घरावर काढलेल्या मोर्चामुळे ११ संचालकांनी सह्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहापूरकरांवर राजीनाम्याची नामुष्की आली. त्यानंतर फौजदारी कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
संधी गमावली, नामुष्की आली..!
एकेकाळी तालुक्यातील अभ्यासू, स्पष्ट वक्ते व पर्यायी नेतृत्व म्हणून शहापूरकरांकडे पाहिले जात होते. परंतु, केवळ स्वभावामुळे तब्बल २२ वर्षे ते कारखान्याच्या सत्तेपासून दूर होते. दोन वर्षांपूर्वी मुश्रीफांच्या सहकार्यामुळे त्यांच्याकडे कारखान्याची एकहाती सत्ता आली. मुश्रीफांचे पाठबळ असतानाही कारखान्याला गतवैभव देण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी त्यांनी गमावली.