Kolhapur: ..अन् जयसिंगपूर रेल्वेस्थानकावर संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:58 IST2025-05-08T12:58:13+5:302025-05-08T12:58:35+5:30
जयसिंगपूर : कोल्हापूर - मिरज पॅसेंजर जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर एक तास थांबविल्याने मिरजेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. ...

Kolhapur: ..अन् जयसिंगपूर रेल्वेस्थानकावर संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखली
जयसिंगपूर : कोल्हापूर - मिरज पॅसेंजर जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर एक तास थांबविल्याने मिरजेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. ७) गोंधळ घातला. मिरज स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील लोंढा रेल्वे चुकल्यामुळे लोंढ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी जयसिंगपूर येथे रेल्वे रोखून काही काळ जाब विचारला. लोंढा रेल्वेसाठी केलेले बुकिंगचे पैसे द्या, अशी मागणी करत प्रवाशांनी गोंधळ घातला.
कोल्हापूरमधून निघालेली कोल्हापूर - मिरज रेल्वे रुकडी, हातकणंगलेबरोबरच जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबविण्यात आली. पॅसेंजर, वंदे भारत रेल्वेमुळे जवळपास एक तास रेल्वे जयसिंगपूर स्थानकावर थांबली होती. मिरज स्थानकावर पोहोचल्यावर लोंढा गाडीचे आरक्षण प्रवाशांनी केले होते. मात्र रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर स्थानकावर जवळपास दीड तास गाडी थांबल्याने लोंढा गाडी चुकल्याने प्रवाशांनी रेल्वे चालकाला जाब विचारला.
नोकरदार व प्रवासी या रेल्वेतून प्रवास करत होते. कोल्हापूरमधून रेल्वे सुटल्यानंतर मिरज स्टेशनवर पोहोचल्यानंतर लगेचच मिरजेतून लोंढा रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांनी तिकीट काढले होते. कोल्हापूर - मिरज रेल्वे रुकडी, हातकणंगले व जयसिंगपूर स्थानकावर जवळपास पावणेदोन तास खोळंबल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली, तर लोंढाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी याचा जाब विचारत काही काळ जयसिंगपूर स्थानकात गोंधळ घालत रेल्वे रोखून धरली.