Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 16:29 IST2024-04-20T16:27:46+5:302024-04-20T16:29:01+5:30
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

Kolhapur: देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूरमधील वृद्धाने संपवले जीवन
इचलकरंजी : देणेकऱ्यांची नावे शरीरावर लिहून कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका वृद्धाने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू गंगाराम कांबळे (वय ६२, रा. सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटीत बाळू कांबळे राहण्यास होते. कबनुरातील एका शेतातील झाडास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी (दि.१८) रात्री निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
कांबळे यांनी आपल्या शरीरावर काळ्या रंगाने काही जणांची नावे आणि देणी लिहिली असल्याची चर्चा आहे. त्यांनी शरीरावर लिहिलेल्या मजकुरासंदर्भात नातेवाइकांचे म्हणणे घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.