‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:38 IST2025-08-14T12:36:59+5:302025-08-14T12:38:40+5:30
कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ‘शुक्रवारी तिरंगा झळकवू शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात’ या टॅगलाईनखाली शक्तिपीठ महामार्ग ...

‘शक्तिपीठ’विरोधात उद्या शेतकरी शेतात फडकवणार तिरंगा
कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ‘शुक्रवारी तिरंगा झळकवू शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात’ या टॅगलाईनखाली शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, याची सुरुवात सकाळी ९ वाजता आकुर्डे (ता. भुदरगड) येथील दौलत शिंदे यांच्या शेतात आंदोलन करून होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता एकोंडी (ता. कागल) लोंढे वसाहत येथील शिवाजी मगदूम यांच्या शेतात आणि त्यानंतर सकाळी ११ वाजता कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन करण्यात येईल.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, सत्यजित जाधव, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बिद्रीचे संचालक एस. आर. कांबळे, एस. बी. पाटील, सुयोग वाडकर आदी सहभागी होणार आहेत.