Kolhapur: हाताचा चावा घेऊन आरडाओरडा केला, आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:35 IST2025-09-22T13:34:24+5:302025-09-22T13:35:03+5:30

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत

An attempted kidnapping of an eight year old girl in Nandani Kolhapur district was foiled due to the fortuitous act of the girl | Kolhapur: हाताचा चावा घेऊन आरडाओरडा केला, आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

Kolhapur: हाताचा चावा घेऊन आरडाओरडा केला, आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ ) येथे आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेत स्वरा शीतल देसाई हिने आरडाओरड केल्याने अंधाराचा फायदा घेत अपहरणकर्ते पळाले. ही घटना शुक्रवारी (दि.१९) घडली.

स्वरा भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात असताना तीन ते चार जणांतील एकाने अंधाराचा फायदा घेत तोंड दाबून उचलून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने लहान भाऊदेखील घाबरला. प्रसंगावधान राखून स्वराने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेऊन आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून काही जण घराबाहेरही आले. यावेळी स्वराने ही माहिती लोकांना दिली.

अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते शिरोळ मार्गावरून पळाले. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटलेल्या स्वराचे आई-वडीलही घाबरून गेले होते. मुले सुखरूप असल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

स्वराच्या धाडसाचे कौतुक

स्वरा नांदणीतील पीएमश्री शहा तुळजाराम नागरदास कन्या विद्या मंदिरमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत आहे. घडलेली घटनेची माहिती तिने शनिवारी सकाळी शाळेत विद्यार्थिनीसमोर कथन केली. यावेळी शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याची मागणी

शिरोळ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. गावात मुले पळवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: An attempted kidnapping of an eight year old girl in Nandani Kolhapur district was foiled due to the fortuitous act of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.