Kolhapur-Local Body Election Voting: गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ-स्वाती कोरी यांच्यात वादावादी, येथील निकालाकडे राज्याचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:33 IST2025-12-03T12:31:39+5:302025-12-03T12:33:36+5:30
राष्ट्रवादीविरुद्ध महायुती

Kolhapur-Local Body Election Voting: गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ-स्वाती कोरी यांच्यात वादावादी, येथील निकालाकडे राज्याचे लक्ष
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध जनता दल-जनसुराज्य-भाजपा-शिंदेसेना महायुती यांच्यात चुरशीचा दुरंगी सामना झाला. त्यामुळे एकेका मतासाठी शेवटपर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे कांही केंद्रावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवले. एका केंद्रावर मंत्री हसन मुश्रीफ आणि जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली असून, येथील निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दुपारी तीनच्या सुमारास साडेतीनच्या सुमारास मंत्री मुश्रीफ हे आपल्या कार्यकर्त्यांसह शहरातील साधना हायस्कूलमधील मतदान केंद्रात आले. त्यांच्या पाठोपाठ जनता दलाच्या माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यादेखील समर्थकांसह गेल्या. दोघांची आमने-सामने भेट होताच ‘मी आलो म्हणून, तुम्ही यावे असे कुठे असते का? असा प्रश्न मुश्रीफांनी केला. आपण मतदानाची माहिती घेतली, असेही त्यांनी सांगितले.
वाचा : मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारी
तथापि, मीदेखील मतदानाची आकडेवारी घेतली. ‘मतदान केंद्रात आम्हाला प्रतिबंध करणारे पोलिस तुम्हाला सोडतात. एकाला एक-दुसऱ्याला दुसरा नियम असतो का? तुम्ही जसे तुमच्या पक्षाचे प्रमुख तशी मी माझ्या पक्षाची प्रमुख आहे’, असे प्रत्युत्तर कोरी यांनी दिले. त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीची चर्चा जिल्हाभर रंगली.
सकाळी बॅ. नाथ पै विद्यालयातील केंद्रात मतदान प्रक्रिया सुरू होत असतानाच पहिले मतदान करण्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे उमेदवार बसवराज खणगावे आणि भाजपचे उमेदवार आप्पा शिवणे यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर मुलींचे हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदार आणण्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल भमानगोळ आणि शिंदेसेनेचे उमेदवार दुंडाप्पा नेवडे यांचे चिरंजीव विनायक नेवडे यांच्यात वादावादी झाली. या घटनांमुळे संबंधित केंद्राच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.