Kolhapur- Kalamba gas pipeline explosion: परवानगी रद्द; तरीही गॅस पाइपलाइनचे सुरु होते काम
By उद्धव गोडसे | Updated: September 19, 2025 17:06 IST2025-09-19T17:05:21+5:302025-09-19T17:06:43+5:30
तिघांचे बळी जाऊनही प्रकल्प अधिकारी मोकाट, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

Kolhapur- Kalamba gas pipeline explosion: परवानगी रद्द; तरीही गॅस पाइपलाइनचे सुरु होते काम
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पावसाळ्यात रस्ते खोदाईबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापालिकेने भूमिगत गॅस पाइपलाइनचे काम थांबविण्याच्या सूचना एचपी ऑइल गॅस कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कंपनीने काम सुरूच ठेवल्यामुळे कळंबा येथील मनोरमा कॉलनीत दुर्घटना घडली. विशेष म्हणजे दुर्घटनेस जबाबदार असलेले प्रकल्प अधिकारी आणि सिनिअर मॅनेजर यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. भोजणे कुटुंबातील तिघांचे बळी गेल्यानंतरही कंपनीचे प्रमुख अधिकार मोकाट असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील वॉर्ड क्रमांक ५८, ६८, ६९ आणि ७७ मधील भूमिगत गॅस पाइपलाइनचे काम करण्यास महापालिकेने एचपी ऑईल गॅस प्रा.लि. कंपनीला ऑक्टोबर २०२० मध्ये परवानगी दिली. त्यावेळी ६६ अटी घालून करार केला होता. यात नागरिकांनी तक्रारी केल्यास किंवा नागरी सुविधांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास काम बंद ठेवण्याच्या सूचना देण्याचा अधिकार महापालिकेने राखून ठेवला होता.
वाचा : कळंबा गॅस स्फोटातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
पावसाळ्यात रस्ते खोदाईमुळे अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांनी कंपनीच्या कामाबद्दल महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपशहर अभियंत्यांनी १२ जून २०२५ मध्ये कंपनीला पत्र पाठवून पुढील आदेशापर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरीही कंपनीने काम सुरू ठेवून आदेश आणि अटींचे उल्लंघन केले. काम बंद असते तर कळंब्यातील दुर्घटना घडली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेची नोटीस
कळंबा येथील अमर भोजणे यांच्या घरात झालेल्या गॅस स्फोटाच्या दुर्घटनेनंतर २० दिवसांनी महापालिकेने कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. काम बंद ठेवण्याचा आदेश दिला असताना रस्ते खोदाई आणि गॅस कनेक्शन देण्याचे काम कसे काय सुरू ठेवले? करारातील अनेक अटींचे उल्लंघन झाले आहे. अटींचा भंग करून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तुमच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये? अशी विचारणा महापालिकेने कंपनीला केली आहे.
जबाबदार अधिकारी नामानिराळे?
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून गॅस पाइपची जोडणी करणे, कामाची पडताळणी करणे, त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य प्रकल्प अधिकारी बाबासाहेब सोपानराव सोनवणे आणि सिनिअर मॅनेजर हेमंतकुमार शेषनाथ यादव यांची होती. त्याअर्थी चांगल्या कामाचे श्रेय आणि दुर्घटनांची जबाबदारी त्यांच्याकडेच जाते. गॅस स्फोटाच्या दुर्घटनेबद्दल दुय्यम अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ अधिकारी मात्र नामानिराळे राहिल्याच्या तक्रारी कळंबा येथील नागरिकांकडून केल्या जात आहेत.
६६ अटींचा करार
एचपी ऑइल गॅस कंपनीला रस्ते खोदाईची परवानगी देताना महापालिकेने ६६ अटी घालून करार केला होता. परवानगी एक वर्षासाठी वैध राहील. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास प्रतिदिन पाच हजार रुपये दंड होईल. नागरिकांच्या तक्रारी असतील तर काम बंद करावे लागेल. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून काम पूर्ण करावे लागेल अशा अनेक अटी करारात नमूद केल्या आहेत. या अटींचे उल्लंघन झाल्याचे महापालिकेने सांगितले आहे.