Kolhapur News: आरे-सावरवाडी नजीक नदीपात्रात आढळला बेवारस मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:58 IST2022-12-30T17:38:18+5:302022-12-30T18:58:41+5:30
नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती सर्वत्र पसरताच उडाली एकच खळबळ

Kolhapur News: आरे-सावरवाडी नजीक नदीपात्रात आढळला बेवारस मृतदेह
शिवाजी लोंढे
कसबा बीड : करवीर तालुक्यातील आरे-सावरवाडी नदीपात्रात बेवारस मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० ते ४५ वर्षाच्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. मृतदेहाचा चेहऱ्यावरील भाग माशांनी खाल्याने ओळख पटणे मुश्कील झाले आहे. नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु आहे.
आरे-सावरवाडी नदीपात्रात (आंबीलकाटा परिसर) येथे बेवारस मृतदेह आढळला. मृतदेहाच्या अंगात पांढरा शर्ट व काळी पॅंट आहे. आज सकाळच्या सुमाराला हा मृतदेह निदर्शनास येताच नागरिकांनी अरे गावचे पोलीस पाटील विनायक लोहार यांना फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पाटलांनी घटनास्थळी धाव घेत खात्री करून करवीर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील व सहायक पोलिस कॉन्स्टेबल राजू बैनवाड घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णात सोरटे (आरे) व सतीश पाटील (सडोलीकर) यांना मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. मृतदेहाचा पंचनामा करून व पुढील तपासासाठी मृतदेह सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे नेण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.