Kolhapur: मिरवणुकीच्या धामधुमीत हळूच सटकले अन् वृद्धेला लुटून गोबर गॅसमध्ये ढकलेले, पनोरी येथील खुनाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:44 IST2025-09-11T14:42:10+5:302025-09-11T14:44:02+5:30
कर्जबाजारीपणातून कृत्य, गावातीलच दोघांना अटक

Kolhapur: मिरवणुकीच्या धामधुमीत हळूच सटकले अन् वृद्धेला लुटून गोबर गॅसमध्ये ढकलेले, पनोरी येथील खुनाचा उलगडा
कोल्हापूर : चैनीखोर वृत्तीतून वाढलेले कर्ज फेडण्यासाठी दोन तरुणांनी पनोरी (ता. राधानगरी) येथील वृद्धेचे दागिने लुटून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. अभिजित मारुती पाटील (व ३४) आणि कपिल भगवान पातले (३४, दोघे रा. पनोरी) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. शनिवारी (दि. ६) गावात गणेश विसर्जन मिरवणुकांची धामधूम सुरू असताना त्यांनी श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३) यांचे दागिने लुटले. डोक्यात धारदार शस्त्र मारून खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्ड्यात टाकला होता.
पनोरी येथील विजय शंकर बरगे यांच्या गोबर गॅसच्या खड्ड्यात श्रीमंती रेवडेकर यांचा मृतदेह आढळताच परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाच्या अंगावरील दागिने लंपास झाल्याचे लक्षात येताच चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. राधानगरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला संशयितांची माहिती मिळाली.
संशयित अभिजित पाटील आणि कपिल पातले हे दोघे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीतून निघून गेल्याचे समजले. चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी रेवडेकर यांच्या अंगावरील सहा तोळे दागिने लुटून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. दोघांना अटक केली असून, पुढील तपासासाठी त्यांचा ताबा राधानगरी पोलिसांकडे देण्यात आला.
महिन्यापूर्वी रचला कट
कर्ज फेडण्यासाठी श्रीमंती रेवडेकर यांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा कट या दोघांना महिन्यापूर्वी रचला होता. यासाठी अनंत चतुर्दशीचा दिवस निवडला. सगळे गाव मिरवणुकीत दंग असताना हे दोघे मिरवणुकीतून निघून गेले. मागील दाराने रेवडेकर यांच्या घरात प्रवेश केला. दागिने हिसकावताना विरोध केल्याने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच घरामागे असलेल्या गोबर गॅसच्या खड्ड्यात मृतदेह टाकून त्यांनी पळ काढला होता.
कर्जबाजारीपणातून कृत्य
अभिजित आणि कपिल हे दोघे लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघेही विवाहित आहेत. अभिजित हा एका साखर कारखान्यात नोकरी करतो, तर कपिल शेती करतो. दोघांवर प्रत्येकी दीड ते दोन लाखांचे कर्ज आहे. वाढते कर्ज फेडण्यासाठी लूटमार करण्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली.
दोघांचे मोबाइल पासवर्ड सारखेच
गावात दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. दोघांची गणेश मंडळेही वेगळी आहेत. मात्र, लहानपणापासूनची मैत्री असल्यामुळे दोघांच्या मोबाइलचा पासवर्ड एकच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एकट्या वृद्धेला केले लक्ष्य
श्रीमंती रेवडेकर यांच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मुलगा आणि सून कोल्हापुरात राहतात, तर दोन मुली विवाहित आहेत. अधूनमधून ते आईला भेटण्यासाठी जातात. एकट्या राहणाऱ्या वृद्धेला लक्ष्य करून दोघांनी लूटमार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.