Kolhapur: शाही लव्याजम्यानिशी अंबाबाईचा पालखी सोहळा उत्साहात, पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांकडून दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:37 IST2025-09-23T12:11:14+5:302025-09-23T12:37:56+5:30
शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ मृदंगाचा ताल, अंबा माता की जयचा अखंड गजर अशा मंगलमय वातावरणात अंबाबाईच्या पालखी सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांनी कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतले. रात्री देवीची पालखी कलश आकारात काढण्यात आली. भालदार, चोदार, रोषण नाईक अशा शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ मृदंगाचा ताल, अंबा माता की जयचा अखंड गजर अशा मंगलमय वातावरणात अंबाबाईच्या पालखी सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती.
नवरात्रोत्सवात रोज देशभरातील लाखो भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. सोमवारी घरोघरी घटस्थापना असल्याने दुपारपर्यंत मंदिरात फारशी गर्दी नव्हती; मात्र दुपारनंतर रांगा भाविकांनी फुलून गेल्या. स्थानिक कोल्हापूरकरांसह विविध राज्यांतील भाविक अंबाबाई चरणी लीन झाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील आकडेवारीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत १ लाख १८ हजार ४१७ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. त्यानंतरही रांगा भरलेल्या होत्या. पालखी मिरवणुकीला मंदिरात पाय ठेवायला जागा नसते. ही सगळी आकडेवारी गृहीत धरून सव्वा लाख भाविकांची संख्या देण्यात आली.
वाचा- ‘गाथा शिवशभूंची’ महानाट्याने उघडला कोल्हापूरमधील शाही दसरा महोत्सवाचा पडदा
रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची मंदिर परिसरातच पालखी मिरवणूक काढली जाते. परिसरातील फूल व्यावसायिकांकडून रोज वेगवेगळ्या आकारात पालखीची सजावट केली जाते. सोमवारी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कलशाच्या आकारात फुलांनी सजवलेली सुवर्ण पालखी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले.
अंबाबाईच्या नावाची पारंपरिक लवाजम्यासह गरुड मंडपातून बाहेर पडली. यावेळी हजारो भाविकांनी पालखीतील उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. उदं गं अंबे उदंच्या गजरात सारा मंदिर आवार दुमदुमला. पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. मानाच्या नायकिणींनी देवीची गीते सादर केली. पालखी सोहळ्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती गरुड मंडपातील सदरेवर विराजमान झाली. त्यानंतर येथेही देवीसमोर गानसेवा सादर करण्यात आली. त्यानंतर उत्सवमूर्ती गाभाऱ्यात गेली. शेजारती होऊन नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.