Kolhapur: नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांना सुवर्ण झळाळी, विशेष अन् नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने कोणते..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:20 IST2025-09-19T19:09:18+5:302025-09-19T19:20:18+5:30
देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही

Kolhapur: नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाईच्या दागिन्यांना सुवर्ण झळाळी, विशेष अन् नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने कोणते..जाणून घ्या
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नित्य व नैमित्तिक अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. किरीट गदा, चिंचपेटी, बोरमाळ, ठुशी या अलंकारांसह सोन्याची पालखी, सोन्याचे मोर्चेल, सोन्याचा सिंह, गदा यांनाही सुवर्ण झळाळी आली.
देवीच्या या पुरातन दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही. फक्त रिठ्याचे पाणी आणि बारीक वाळूच्या साह्याने दागिन्यांचा लखलखाट आणला जातो. आज शुक्रवारी अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता केली जाणार आहे.
शारदीय नवरात्रौत्सवाला आता तीन दिवस राहिल्याने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. वर्षातून एकदा नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या खजिन्यातील सर्व अलंकारांची स्वच्छता केली जाते. अंबाबाईच्या खजिन्यात आदिलशाही काळातील, यादव, शिलाहारकालीन तसेच ऐतिहासिक दागिने आहे.
सोन्याचे दागिने वर्षभरातील रोजच्या पूजेत वापरले जातात. तर रत्नजडित अलंकार हे नवरात्रौत्सवात तसेच विशेष सालंकृत पूजेसाठी वापरले जातात. या दोन्ही वापरातील अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. अंबाबाईच्या खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर यांच्या देखरेखीखाली महेश कडणे यांच्यासह गजानन कवठेकर, दादा कवठेकर व कारागिरांनी ही स्वच्छता केली. आज शुक्रवारी चांदीच्या साहित्याची स्वच्छता केली जाईल.
अंबाबाईच्या नित्य पूजेत वापरले जाणारे दागिने
सोन्याचे किरीट, गदा, पावले, चिंचपेटी, बोरमाळ, कंठी, मंगळसूत्र, नथ, कानाचे मोरक्षी, कुंडले, बोरमाळ, मोहराची माळ, चंद्रहार, चाफेकळी हार, ठुशी, म्हाळूंग, कवड्याची माळ, सिंह
विशेष पूजेत वापरले जाणारे दागिने
नवरत्नांचे जडावाचे किरी, जडावाचे मोरपक्षी, कुंडल, चिंचपेटी, पेंडल, लप्पा हार, सात पदरी कंठी, सोळा पदरी कंठी, श्रीयंत्र, मोत्याची माळ.
लाकडी रॅम्प
अंबाबाई मंदिरात जाताना महाकाली मंदिरापासून ते कासव चौक, सरस्वती मंदिरापर्यंत लाकडी रॅम्प करण्यात येत आहे. मंदिरातील खालचे दगड खाली-वर असल्याने भाविकांचा तोल जाऊ नये म्हणून हे रॅम्प बनवण्यात येत आहेत.
दक्षिण दरवाजासमोर गेट
अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर अनेक चारचाकी वाहने येत असल्याने भाविकांना फिरण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे येथे मोठे गेट तसेच उभे खांब बसवले आहेत.