कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला आठ महिन्यात १२ कोटींचे उत्पन्न, सर्वाधिक रक्कम दानपेटीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:44 IST2025-12-31T18:44:20+5:302025-12-31T18:44:50+5:30
पूजाविधी, ऑनलाईन देणगीचाही समावेश

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला आठ महिन्यात १२ कोटींचे उत्पन्न, सर्वाधिक रक्कम दानपेटीत
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला गेल्या आठ महिन्यात १२ कोटी ६ लाख ४६ हजार ३८९ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ही आकडेवारी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंतची असून त्यात सर्व देवताकृत्ये, साडी देणगी, ऑनलाईन देणगी अशा वेगवेगळ्या पद्धतीतून आलेल्या रकमेचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक ६ कोटींची रक्कम दानपेटीतून आली आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला वर्षभरात ६० लाखांहून अधिक भाविक भेट देतात. आठवड्यातील शुक्रवार, शनिवार रविवार हे तीन दिवस, नवरात्रौत्सव, उन्हाळ्यातील सुट्ट्या, दिवाळी, ख्रिसमस या सुट्ट्यांच्या दिवसात तर ही आकडेवारी दिवसाला दीड लाख ते अडीच लाखांपर्यंत जात आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ झाली आहे.
मंदिराला सर्वाधिक उत्पन्न दानपेट्यांतून मिळते. आठ महिन्यात ही रक्कम ६ कोटी ७१ लाखांवर गेली आहे. त्या पाठोपाठ पावतीने आलेली देणगी, क्युआर कोडने आलेली देणगी, अंबाबाईचा अभिषेक, कुंकुमार्चनसह वेगवेगळे देवताकृत्ये, साडी विक्री अशा विविध प्रकारच्या देणगीतून हे उत्पन्न मिळाले आहे.
देणगीचा प्रकार : रक्कम
दानपेटी : ६ कोटी ७१ लाख ११ हजार ६५०
देणगी : १ काेटी २९ लाख ७४ हजार ४९०
क्युआर देणगी : ६८ लाख ८७ हजार ८००
देवताकृत्य : ६६ लाख २ हजार ९९६
देणगी (यूपीआय) : ४८ लाख ५६
देवताकृत्य (ऑनलाईन) : ४२ लाख ६५ हजार ३१७
साडी देणगी : ४२ लाख ३० हजार ७१९
ऑनलाईन देणगी : ४१ लाख ९४ हजार २१९
अन्नदान देणगी : ४० लाख ३६ हजार ५१९
साडी देणगी (यूपीआय) : ३२ लाख १३ हजार ६१५
अन्नदान देणगी (यूपीआय) : २३ लाख २९ हजार ००८
एकूण : १२ कोटी ६ लाख ४६ हजार ३८९