कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन चार दिवस बंद, गाभाऱ्याचे जतन व संवर्धनाचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:48 IST2026-03-14T11:48:05+5:302026-03-14T11:48:29+5:30
परीक्षा संपल्यानंतर भाविक वाढणार

संग्रहित छाया
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या मंदिर विकास प्रकल्पाअंतर्गत गाभाऱ्याचे जतन व संवर्धन करण्यात येणारे असल्याने अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज, शनिवारपासून मंगळवारपर्यंत (दि. १४ ते १७ ) बंद राहील.
या कालावधीत भाविकांसाठी प्राणप्रतिष्ठापित मंगल श्रीकलश तसेच उत्सवमूर्तीचे दर्शन मुक्ती मंडप (पितळी उंबरा) येथून करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरातत्व विभागामार्फत मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत व बाहा भागांचे जतन व संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. त्यात मंदिराचे मूळ दगडी बांधकामाचे जतन व संवर्धन केले जात आहे. त्यासाठी सॅण्ड ब्लास्टिंग हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. सॅन्ड ब्लास्टिंगमुळे दगडी भिंतींना पडलेल्या भेगा चिरा भरून निघतात तसेच बांधकाम अधिक भक्कम होते. आतापर्यंत मंदिराच्या बाह्य परिसरात पितळी उंबऱ्यापर्यंत हे काम झाले आहे. आता चांदीच्या उंबऱ्याच्या आतील भागात म्हणजे मुख्य गाभाऱ्यात आजपासून सुरुवात करण्यात येत आहे.
सॅन्ड ब्लास्टिंग, वॉशिंग केले जाईल. यामध्ये दगडी भिंतीमधील भेगा व चिरा आढळल्यानंतर ते भरून घेतले जाईल तसेच फरशांचे काम, दगडांची जोडणी केली जाणार आहे. मंगळवारी (दि. १७) देवीचे आगमोक्त्त व वेदोक्त धार्मिक विधी तसेच पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या आरतीपासून श्रीअंबाबाईचे पूर्ववत सुरू होईल. तरी भक्तांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.
परीक्षा संपल्यानंतर भाविक वाढणार
सध्या परीक्षांचा कालावधी असल्याने अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी कमी आहे. पुढील आठवड्यात गुढीपाडवा आहे. त्याआधी गाभाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. परीक्षा संपताच १५ एप्रिलनंतर पुन्हा गर्दी वाढणार आहे त्याआधी मंदिर व बाह्य परिसरातील कामे वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.