नगराध्यक्ष पद खुले झाल्याने जयसिंगपुरात चुरस, नेत्यांची होणार पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:27 IST2025-10-07T18:27:32+5:302025-10-07T18:27:52+5:30
ताराराणीचे मोट बांधणारेच यड्रावकर गटात सहभागी झाल्याने विरोधी नेत्यांना नव्याने आघाडी बांधावी लागणार

नगराध्यक्ष पद खुले झाल्याने जयसिंगपुरात चुरस, नेत्यांची होणार पळापळ
जयसिंगपूर : नगराध्यक्ष पद खुले झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होणार असली तरी गटातटावर पालिकेची निवडणूक होणार आहे. यड्रावकर गटाकडून माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीकडून डॉ. श्रीवर्धन पाटील तर जे.जे. मगदूम संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.
मागील निवडणुकीवेळी अनुसूचित जाती महिला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण होते. त्यामुळे सक्षम उमेदवाराचा शोध आघाड्यांना घ्यावा लागला. त्यातून सत्ता शाहू आघाडीची तर नगराध्यक्ष ताराराणी आघाडीचा झाला होता. ताराराणीचे मोट बांधणारेच यड्रावकर गटात सहभागी झाल्याने विरोधी नेत्यांना नव्याने आघाडी बांधावी लागणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता असलीतरी पालिकेच्या निवडणुकीत यड्रावकर गटासोबत महायुतीला मिळते-जुळते घ्यावे लागणार आहे.
पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांमधूनच ही निवडणूक होणार असल्याने आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहतील तर काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील आघाडी कशी बांधतात, यावर देखील लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.