Kolhapur ZP Election 2026: जागावाटपात हातघाई; महायुतीमधील तिन्ही पक्षांचा सवतासुभा, 'करवीर'मध्ये आघाडीत बिघाडी, तालुकानिहाय कुठं कशा लढती होणार..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:25 IST2026-01-22T12:23:55+5:302026-01-22T12:25:31+5:30
जिल्ह्यात राजकीय धुमश्चक्री

Kolhapur ZP Election 2026: जागावाटपात हातघाई; महायुतीमधील तिन्ही पक्षांचा सवतासुभा, 'करवीर'मध्ये आघाडीत बिघाडी, तालुकानिहाय कुठं कशा लढती होणार..वाचा सविस्तर
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात राजकीय धुमश्चक्री पाहावयास मिळाली. बाराही तालुक्यांत कुठेच महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे चित्र नसून काँग्रेसने मात्र शांतपणे ३८ ठिकाणी काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ‘महायुतीमध्ये जागावाटपात हातघाई, काँग्रेस लांबून मजा पाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
करवीरमध्ये भाजप - राष्ट्रवादीची युती; शिंदेसेना, काँग्रेस स्वतंत्र लढणार
करवीर तालुक्यात अनपेक्षितपणे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असून, शिंदेसेना आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या तिरंगी लढती लक्षवेधी होणार आहेत. भाजपने करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद जागा मागणी केली होती. याला आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोध केल्याने महायुती तुटली. राष्ट्रवादीने (अजित पवार) भाजपसाठी शिये व शिंगणापूर हे दोन मतदारसंघ सोडले तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जागांवर भाजप लढणार आहे. काँग्रेस सर्व जागा ‘हात’ चिन्हावर लढणार आहे.
हातकणंगलेत जनसुराज्य, राष्ट्रवादीने डोकेदुखी वाढवली
तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत निश्चित असली तरी जनसुराज्य आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. कुंभोज आणि रेंदाळ येथून भाजपने अर्ज दाखल केल्यामुळे आमदार विनय कोरे आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत भाजपच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघातही दोन्ही पक्षांचे अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या भवितव्याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे.
वाचा : जिल्हा परिषदेसाठी ९०७, पंचायत समितीसाठी १५३० उमेदवारी अर्ज, माघारीची मुदत मंगळवारपर्यंत
शिरोळमध्ये यड्रावकर भाजप युती फिस्कटली
शिरोळमधील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि भाजपमधील युती फिस्कटली असून, भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि यड्रावकर यांच्यात चर्चाही झाली हाेती आणि जागावाटपही ठरले होते. परंतु, यड्रावकर यांनी उदगाव गटासाठी उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
राधानगरीमध्ये चौरंगी लढती
राधानगरीमध्ये युतीमध्ये विचका झाला आहे. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे दिसून आले. माघारीपर्यंत काही तडजोडी झाल्या नाही, तर या चौरंगी लढती जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार आहेत.
गडहिंग्लजमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात सामना
गडहिंग्लज तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातच खरा सामना होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार दोन्ही पक्ष एकत्र आले असून, जनता दलाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसही उद्धवसेना, वंचितला सोबत घेऊन काही जागा लढवणार आहे. शिंदेसेना तीन जिल्हा परिषद मतदारसंघात तर जनसुराज्य केवळ नूल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा लढवणार आहे. स्वाभिमानी केवळ हलकर्णी जिल्हा परिषदेची जागा लढवत आहे. बुधवारी संग्रामसिंह कुपेकर यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सकाळी ‘शिनोळी’त राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात तर दुपारी ‘गडहिंग्लज’मध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. अवघ्या एका दिवसात दोन पक्षांतील प्रवेशाची नोंद त्यांच्या नावावर झाली.
चंदगडमध्ये काँग्रेसचे गोपाळराव पाटील भाजपसोबत
गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी भाजप आणि पाटील गट एकत्रित निवडणूक लढवेल तर विरोधात दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस असेल.
आजऱ्यात भाजप-शिंदेसेनेची युती फिस्कटली, शिंपी शिंदेसेनेसोबत
आजरा तालुक्यात भाजप व शिंदेसेनेची युती फिस्कटली आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने माजी सभापती विष्णुपंत केसरकर शिंदेसेनेतून रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचा शिंपी गट शिंदेसेनेसोबत असून, राष्ट्रवादी, शिंदेसेना व भाजप स्वतंत्रपणे पक्षीय बळ आजमावणार आहेत. तर उत्तूरमधून ताराराणी आघाडीही रिंगणात असेल.
भुदरगडमध्ये शिंदेसेना, भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी
भुदरगड तालुक्यात अखेर शिंदेसेना आणि भाजपचे जमले असून, विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत होईल. भुदरगडमध्ये भाजपला केवळ तीन पंचायत समित्या देण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेची एकही जागा शिंदेसेनेने दिलेली नाही. तरीही ही युती झाली असून, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के. पी. पाटील युतीचा दुसरा अंक सुरू झाल्याचे मानले जाते.
शाहूवाडीत महायुती विरुद्ध महाविकास
शाहूवाडी तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत हाेणार आहे. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
कागलमध्ये धुमशान सुरू
कागलमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी लढत असून, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही काही ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, अन्य तालुक्यात आग्रही भूमिका घेणारी काँग्रेस कागल तालुक्यात नेमकी काय भूमिका घेणार याकडे महाविकास आघाडीच्या इच्छुक कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.