कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:45 IST2021-05-14T08:41:42+5:302021-05-14T08:45:02+5:30

सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत.

All industries in Kolhapur, including MIDC, will be closed for 8 days from Sunday | कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार

कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीसह सर्व उद्योग, कारखाने येत्या रविवारपासून पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उद्योजकीय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी दिली.

सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शनिवार, १५ मे ते रविवार, २३ मेपर्यंत आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याबाबतची भूमिका उद्योजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी आमदार जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जाहीर केली. शनिवारी मध्यरात्रीपासून २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने वगळता अन्य उद्योग, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.

सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होणार
शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल- हातकणंगले औद्योगिक वसाहतींमध्ये दरमहा ७० हजार टन कास्टिंग्जचे उत्पादन होते, तर सरासरी ६०० कोटींची उलाढाल होते. फौंड्री बंद राहिल्याने सुमारे २२५ कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याचे आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले आणि स्मॅॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले. फौंड्रीसह अन्य उद्योग, कारखाने बंद राहणार असल्याने सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होईल, असे ‘मॅॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांनी सांगितले.
 

Web Title: All industries in Kolhapur, including MIDC, will be closed for 8 days from Sunday