शिरोलीजवळ अपघातात आजऱ्याचा डॉक्टर ठार, आईला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी मिरजेतून येत होता कोल्हापूरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:26 IST2025-12-21T19:24:36+5:302025-12-21T19:26:08+5:30
ट्रकची दुचाकीला धडक : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथे घटना

शिरोलीजवळ अपघातात आजऱ्याचा डॉक्टर ठार, आईला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी मिरजेतून येत होता कोल्हापूरला
शिरोली : मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने मलिग्रेपैकी कागीनवाडी (ता. आजरा) येथील डाॅ. प्रसाद उर्फ बाबू दिगंबर बुगडे (वय २९) हे जागीच ठार झाले. हा अपघात पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथे झाला.
घटनास्थळापासून केवळ ५०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या आईची आणि मुलाची ताटातूट झाली. गावात दवाखाना सुरू करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, डॉ. बुगडे हे मिरज येथून कोल्हापूरला कणेरी मठ येथील रुग्णालयात आईचे डोळे दाखवण्यासाठी दुचाकीवरून येत होते. त्यांची आई कागीनवाडी येथून एसटी बसने तावडे हॉटेल येथे आली होती. प्रसाद हे आईला कणेरी मठ येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणार होते. तोच काळाने घाला घातला.
डॉ. प्रसाद हे एकुलते एक होते. वडील दिनकर बुगडे हे कागीनवाडीचे पोलिस पाटील होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. प्रसाद शिक्षणासाठी सांगली येथील डॉक्टर असलेल्या बहिणीकडे राहात होते. त्यांनी बीएचएमएस पदवी घेतली होती.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कागीनवाडीत दवाखाना सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, तत्पूर्वीच अपघातीमृत्यू झाल्याने दवाखाना सुरू करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. त्यांच्या पश्चात आई, तीन बहिणी असा परिवार आहे. अभ्यासात हुशार असलेल्या प्रसाद यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच घेतले. बारावी गडहिंग्लज येथे पूर्ण केली, तर वैद्यकीय शिक्षण कवठेमहांकाळ येथे झाले. सध्या ते मिरज येथे डॉक्टर बहिणीकडे राहात होते.
आईला नेणार होता रुग्णालयात
आईला ते डोळ्यांच्या उपचारासाठी कणेरी मठ येथील रुग्णालयात घेऊन जाणार होते. त्यांची आई तावडे हॉटेल परिसरात येऊन थांबली होती. केवळ सुमारे ५०० मीटर अंतर असतानाच आईची भेट न होताच प्रसाद यांचा अपघाती मृत्यू झाला. कुटुंबातील सर्वांत लहान असतानाही घरातील जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.