कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी
By भारत चव्हाण | Updated: November 7, 2025 17:37 IST2025-11-07T17:36:37+5:302025-11-07T17:37:14+5:30
भाजप ३३ जागांवर आग्रही, महाविकास आघाडीत अद्याप शांतताच

कोल्हापुरात महायुतीत पालिका निवडणुकीआधीच ‘इलेक्टिव्ह मेरिट’वाल्यांची खेचाखेची; शिंदेसेनेची आघाडी
भारत चव्हाण
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीतील घटक पक्षात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. नव्या सभागृहात आपलाच महापौर करण्याबरोबरच नगरसेवकांची संख्याही सर्वाधिक आपलीच असावी यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याची महायुतीत चढाओढ सुरू आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या याबाबतच संभ्रम आहे. काही नेते एकत्रित लढण्याचे सांगत आहेत, दुसरीकडे स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली जात आहे. अशीच परिस्थिती कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र तयारी करत आहेत. एवढेच नाही तर जागांवर देखील दावे करू लागले आहेत. जास्त जागा मागणीसाठी नेते मंडळी सरसावली आहेत.
जागावाटपाचा विषय अजून लांब असला तरी आतापासूनच महायुतीत चढाओढ सुरू झाली आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्याची सुरुवात झाली आहे. शिंदे सेनेने यात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी व भाजपही काही मागे नाही. शिंदे सेनेने सुरुवातीला काँग्रेसमधील पंधराहून अधिक नाराज माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले. भाजपने राष्ट्रवादी व काँग्रेसचे माजी नगरसेवक घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिंदेसेना व भाजपचे माजी नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत.
भाजप ३३ जागांवर आग्रही
भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी पूर्वीच्या सभागृहातील ३३ जागांवर आपलाच हक्क असल्याने त्या तर मिळाल्यास पाहिजेत, असा आग्रह धरला आहे.
शिंदेसेनेची आक्रमक तयारी
शिंदे सेनेने माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांची आक्रमकपणे जुळवाजुळव केली आहे. आजच्या घडीला शिंदेसेनेने जवळपास ३० पेक्षा अधिक माजी नगरसेवकांची यादी तयार केली आहे.
राष्ट्रवादीचा शिंदेसेना, भाजपला धक्का
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिंदेसेना, भाजपला धक्का देण्याचे तंत्र अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच त्यांचे पाच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत घेतले असून अजूनही काही जण येणार असल्याचा दावा केला जात आहे.
महाविकास आघाडीत शांतता
महायुतीत जोरदार तयार सुरू असताना महाविकास आघाडीत मात्री अद्यापही शांतता आहे. काँग्रेस वगळता उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बैठकाही झालेल्या नाहीत.