गुन्हा कराल तर खैर नाही; निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना दम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:24 IST2025-10-29T17:24:29+5:302025-10-29T17:24:51+5:30
सराईतांची गर्दी

गुन्हा कराल तर खैर नाही; निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना दम
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी हजेरी घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २८) शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात १०४ गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांना कडक शब्दात समज देण्यात आली. यापुढे गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपअधीक्षक पाटील यांनी गुन्हेगारांना दिला.
आगामी निवडणुकांमध्ये सराईत गुन्हेगारांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना हजर करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
गेल्या १० वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या १०४ गुन्हेगारांनी शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात हजेरी लावली. यात त्यांची ओळख परेड घेण्यात आली. ते सध्या काय करीत आहेत? त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? त्यांच्यावर नवीन कोणते गुन्हे दाखल झाले आहेत काय? त्यांचा काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे काय? याची माहिती घेण्यात आली.
उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. चोरी, मारामारी, खंडणी उकळणे, अंमली पदार्थांची विक्री करणे, दारूची तस्करी, गँगवॉर अशा गुन्ह्यांमध्ये पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच संघटित गुन्हेगारी आणि झोपडपट्टी दादांची दहशत मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष डोके, संजीव झाडे, सुशांत चव्हाण आणि सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड उपस्थित होते.
सराईतांची गर्दी
राजारामपुरी परिसरातील एसपी गँग, आरसी गँग, राजेंद्रनगर, यादवनगर, टेंबलाई नाका झोपडपट्टी यासह सदर बाजार, शिवाजी पार्क, ताराराणी चौक, रुईकर कॉलनी, वारे वसाहत, फुलेवाडी रिंगरोड येथील सराईत गुन्हेगार उपस्थित होते. घरफोड्या करणारा सराईत चोरटा गुरुदत्त पोळ याचीदेखील पोलिसांनी हजेरी घेतली.
पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगार
- राजारामपुरी - ४०
- शाहूपुरी - २४
- जुना राजवाडा - २३
- लक्ष्मीपुरी - १७