कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची भुरभुर, रोप लागणीची धांदल; पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:13 IST2025-07-14T12:09:38+5:302025-07-14T12:13:53+5:30
पंचगंगा नदीची पातळी कमी झाली

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या. धरणातून होणारा विसर्ग कायम असल्याने नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी अवघ्या ५ इंचाने कमी झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होत आहे. रविवारी सकाळीच अनेक ठिकाणी पावसाने भुरभुर सुरु केली होती. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड तालुक्यात जोरदार सरी कोसळल्या. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक २४.३ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे.
अद्याप १६ बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून प्रति सेकंद ३१००, वारणातून ४५०० तर दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पातळी १९.३ फुटावर असून अद्याप १६ बंधारे पाण्याखाली आहेत.
रोप लागणीसाठी धांदल
पावसाने उसंत घेतल्याने खोळंबलेल्या भात व नागली राेप लागणीची धांदल उडाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात शिवारात लगबग पहावयास मिळत आहे.