Kolhapur News: पांढऱ्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू; इंगळीत मध्यरात्रीच तरुणांनी मांडली अघोरी पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:06 IST2025-10-24T18:05:09+5:302025-10-24T18:06:24+5:30
पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली

Kolhapur News: पांढऱ्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू; इंगळीत मध्यरात्रीच तरुणांनी मांडली अघोरी पूजा
कोल्हापूर-हुपरी : वेळ मध्यरात्रीची...काही तरुण अचानक बाहेर पडतात अन पांढऱ्या फडक्यात ठेवलेले प्राण्यांचे अवयव, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग थेट वेशीवर आणून ठेवतात. हे सगळे पाहून कुणीही घाबरेल...इंगळी (ता. हातकणंगले) या गावात ऐन दिवाळीत घडलेल्या या अघोरी पूजेने हातकणंगले तालुका भयभीत झाला आहे. सद्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
इंगळीत आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचे उघड झाले आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तरुण गावात संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. पहाटे गावकऱ्यांनी इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच पांढऱ्या फडक्यात ठेवलेले जनावराचे काळीज, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला. या दृश्याने ग्रामस्थांना धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासही सुरू केला आहे. हा प्रकार कोणत्यातरी अघोरी पूजेचा भाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दुसऱ्या वेळी प्रकार
इंगळी परिसरात काही वर्षांपूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडली होती. त्या वेळीही गावाच्या बाहेर अघोरी वस्तू आणि प्राण्यांचे अवयव आढळले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.