Kolhapur News: आईपाठोपाठ मुलानेही घेतला जगाचा निरोप, गावात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:55 IST2025-12-09T17:55:29+5:302025-12-09T17:55:56+5:30
आईच्या उत्तरकार्यापूर्वीच त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याने गावात हळहळ

Kolhapur News: आईपाठोपाठ मुलानेही घेतला जगाचा निरोप, गावात हळहळ
हलकर्णी : आईचे निधन झाले म्हणून गावी आलेल्या मुलानेही सहाव्या दिवशी जगाचा निरोप घेतला. आठवड्याच्या आतच माय-लेकराच्या दुर्दैवी निधनाने तेरणीकर हळहळले.
सोमवारी (दि.१) श्रीमती बाळकाबाई जोतिबा जाधव (वय ९१) यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मुलगा करवीर हे गावी आले होते. दरम्यान शनिवारी (दि.६) मध्यरात्री त्यांना अचानक छातीत दुखू लागले. उपचारापूर्वीच त्यांनी रविवारी (दि. ७) पहाटे जगाचा निरोप घेतला.
५२ वर्षांचे करवीर यांनी १९९५ मध्ये मिळेल ते काम करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे एलएल.बी.चे शिक्षण अर्धवट सोडले. ते मुंबईत ओळखीच्या खासगी वकिलाच्या हाताखाली अपघाती विमा सल्लागार म्हणून काम करायचे. येथील मुंबई ग्रामस्थ मंडळाचे ते सदस्य होते. करवीर यांचा गावाशी चांगला संपर्क होता. आईच्या उत्तरकार्यापूर्वीच त्यांनीही जगाचा निरोप घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. करवीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.