Kolhapur: वाद मिटवून हॉटेलमध्ये जेवले अन् पार्किंगमध्ये पुन्हा भिडले, पाच जण जखमी; १४ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:28 IST2023-09-04T12:24:48+5:302023-09-04T12:28:14+5:30
शिरोली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली

Kolhapur: वाद मिटवून हॉटेलमध्ये जेवले अन् पार्किंगमध्ये पुन्हा भिडले, पाच जण जखमी; १४ जणांवर गुन्हे दाखल
कोल्हापूर/शिरोली : व्यावसायिक वादातून आठ दिवसांपूर्वी झालेले भांडण शनिवारी रात्री मिटवून त्याचा आनंद सांगली फाट्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करुन साजरा केला. मात्र, जेवण करुन बाहेर पडताना पार्किंगमध्ये पुन्हा वाद झाला आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले.
दोन्ही गटांतील जखमी उपचारासाठी सीपीआरमध्ये पोहोचल्यानंतर, पुन्हा दोन्ही गट आमने-सामने भिडल्याने सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर राडा झाला. दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात १४ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, शिरोली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी सनदे, श्रीकांत मोहिते आणि अनिकेत लाड यांचा व्यवसायातील पूर्व वैमनस्यातून आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. वाद मिटविण्यासाठी शनिवारी सांगली फाटा येथील एका हॉटेलमध्ये सर्व जण एकत्र आले. जेवण झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास हाॅटेलच्या पार्किंगमध्ये दोन गटांत पुन्हा वाद होऊन मारामारी झाली. अनिकेत लाड, विनायक लाड, श्रीकांत कोळी, पृथ्वीराज यादव, शुभम यादव, आशिष वाडकर, साहिल आयवळे, आदीनाथ यादव, मनिष कुरणे, रूपेश कांबळे, अजय कांबळे यांनी विकी आप्पासाहेब सनदे आणि श्रीकांत मोहिते या दोघांना एडक्यासह काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जखमी सीपीआरमध्ये पोहोचल्यानंतर तिथे पुन्हा दोन्ही गट आमने-सामने भिडल्याने राडा झाला. हल्लेखोरांनी विनायक लाड याच्या आलिशान कारवर दगड घालून तोडफोड केली. याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, ११ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी नऊ जणांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.
रुग्णालयात तणाव
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर दोन्ही गटांत पुन्हा मारामारी झाली. यावेळी हल्लेखोरांनी कारची तोडफोड केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना पांगवले. पृथ्वीराज गजानन यादव (वय २२, रा.शिरोली पुलाची) याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रोहित सातपुते, विकास धनवडे आणि रणजीत मोहिते या तिघांवर गुन्हा दाखल केला.
यांना झाली अटक
अनिकेत सुकुमार लाड, विनायक सुकुमार लाड, श्रीकांत कोळी, शुभम यादव, आशिष वाडकर, साहिल आयवळे, मनिष कुरणे, रूपेश कांबळे, अजय कांबळे या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली. विकी सनदे याने फिर्याद दिली.