Gunratna Sadavarte: ॲड. गुणरत्न सदावर्तेला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:11 AM2022-04-21T11:11:03+5:302022-04-21T12:12:40+5:30

राजारामपुरी पोलीस ठाण्यातून सदावर्तेला न्यायालयात नेण्यात आले.

Adv. Gunaratna Sadavarte will be produced in Kolhapur court today | Gunratna Sadavarte: ॲड. गुणरत्न सदावर्तेला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

Gunratna Sadavarte: ॲड. गुणरत्न सदावर्तेला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात केले हजर

Next

कोल्हापूर :  अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेला कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात आज, गुरुवारी हजर करण्यात आले. काल मध्यरात्री सदावर्तेला कोल्हापुरात आणण्यात आले होते. यानंतर आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणात अटक केलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते याचा मुंबई, सातारापाठाेपाठ कोल्हापूरपोलिसांनी बुधवारी दुपारी ऑर्थर रोड कारागृहातून ताबा घेतला. त्याला पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा कोल्हापुरात आणण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा नोंदवला होता. ॲड. सदावर्ते याने मराठा आरक्षणाविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी अनेक ठिकाणांहून पैसे जमा केले होते, त्याचा त्याने हिशेब दिलेला नाही, त्यामुळे त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचीही मागणी पाटील यांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्याबाबत ॲड. सदावर्ते याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. पण सरकारी पक्षाला कागदपत्रे मिळाली नसल्याने त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारची सुनावणी होऊ शकली नाही. ती सुनावणी आज, गुरुवारी होत आहे.

दरम्यान, कोल्हापूर पोलीस सोमवारी रात्रीच ॲड. सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी गिरगाव न्यायालयात ॲड. सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केला, तो न्यायालयाने मंजूर करून ताबा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी ऑर्थर रोडमधून त्याचा रीतसर ताबा घेतला.

ॲड. सदावर्तेचा ताबा घेऊन सायंकाळी कोल्हापूर पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. तो रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याला आज, गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अकोट पोलिसांचाही अर्ज

दरम्यान, गिरगाव न्यायालयात त्याचा ताबा मिळण्यासाठी अकोट पोलिसांनीही अर्ज केला आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याशिवाय ताबा देता येणार नाही असे न्यायालयाने अकोट पोलिसांना सांगितले.

Web Title: Adv. Gunaratna Sadavarte will be produced in Kolhapur court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.