नामदेव गावडे यांचे आकस्मिक निधन; शेतकरी, श्रमजीवी जनता आणि कामगारांच्या प्रश्नावर अनेक प्रश्नावर त्यांनी उभारले होते लढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 09:33 IST2022-03-23T08:41:05+5:302022-03-23T09:33:54+5:30
शेतकरी नेते म्हणून सुपरिचित असलेले नामदेव गावडे हे विद्यार्थी दशेपासून कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत होते.

नामदेव गावडे यांचे आकस्मिक निधन; शेतकरी, श्रमजीवी जनता आणि कामगारांच्या प्रश्नावर अनेक प्रश्नावर त्यांनी उभारले होते लढे
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य व राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे (वय ६५) यांचे मध्यरात्री एक वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील बीड (ता.करवीर) या गावी आजच बुधवारी दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शेतकरी नेते म्हणून सुपरिचित असलेले नामदेव गावडे हे विद्यार्थी दशेपासून कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत होते. सुरवातीच्या काळात त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नेतृत्व करत, कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात युवकांचे मजबूत संघटन उभे केले. याकाळात युवकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी लढे उभारले. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनून, त्यांनी कामगार व शेतकरी वर्गासाठी आपले आयुष्य समर्पित केले.
गेल्या अनेक वर्षांपासून ते किसान सभेचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर लढे उभारून, त्यांना हक्क मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनातही त्यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली होती. अलीकडेच सहकार वाचविण्यासाठीचा लढा त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर उभारण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी काळी काळ भूषिवले. शेतकरी प्रश्नांवर त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत.