बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:00 IST2022-07-19T17:59:25+5:302022-07-19T18:00:19+5:30
रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू
चिकोडी : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल राज्यातील पंजीपाडा येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
सूरज हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. काल, सोमवारी पत्नीला घेऊन तो सेवेच्या ठिकाणी जात असताना रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सूरज यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले असून सन 2012 साली ते भारतीय सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आज, मंगळवारी सकाळी गावात समजताच हळहळ व्यक्त होत आहे. उद्या, बुधवारी सकाळी दिल्ली विमानाने त्यांचे पार्थिव सांबरा विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा व पोलीस प्रशासनाने सांगितले.