भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:37 IST2025-07-19T13:36:47+5:302025-07-19T13:37:05+5:30
रस्त्यावर ऑईल पडल्याने चालकाचा ताबा सुटून कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरकडे परतताना अपघात, तिघे गंभीर
कोल्हापूर : भाजपमध्ये प्रवेश घेऊन मुंबईहून कोल्हापूरकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सहा जखमीची प्रकृती चांगली असून ते घरी आहेत. नगरसेवक आणि भाजप प्रवेश केलेले दिलीप पोवार यांनी त्यास दुजोरा दिला.
नियाकत नालबंद, अमजद पठाण, परशुराम हेगडे (रा. कनाननगर, कोल्हापूर) यांच्यासह २० कार्यकर्ते १५ जुलैला मुंबईतील भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या दिशेने निघाले. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर पूर्वी अपघात झाल्याने ऑईल पडल्याने चालकाचा ताबा सुटून या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. त्यात नऊजण जखमी झाले. त्यातील तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मदतीसाठी वैद्यकीय सेवा यंत्रणा गतिमान केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला.