Santosh Trophy: लमाणाचं प्वार निघालं सौदी अरेबियाला.!, गुलबर्गा ते रिहाद व्हाया गडहिंग्लज असा प्रेरणादायी प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:38 PM2023-02-27T19:38:12+5:302023-02-27T19:41:40+5:30

गेल्या मे महिन्यापर्यंत अभिषेक आई- वडिलांना खोदकामात मदत करायचा. पहाटे अडीच तास सराव आणि दिवसभर कुटुंबियाना मदत असेच त्याचे वेळापत्रक

Abhishek Powar from Kolhapur left for Saude Arabia for Santosh Trophy national football tournament | Santosh Trophy: लमाणाचं प्वार निघालं सौदी अरेबियाला.!, गुलबर्गा ते रिहाद व्हाया गडहिंग्लज असा प्रेरणादायी प्रवास 

Santosh Trophy: लमाणाचं प्वार निघालं सौदी अरेबियाला.!, गुलबर्गा ते रिहाद व्हाया गडहिंग्लज असा प्रेरणादायी प्रवास 

googlenewsNext

राम मगदूम

गडहिंग्लज : गरीब लमाण कुटुंबातील अभिषेक 'संतोष ट्रॉफी' राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सौदे अरेबियाला रवाना झाला. गुलबर्गा ते सौदी अरेबियाची राजधानी रिहाद व्हाया गडहिंग्लज असा त्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.

अभिषेक शंकर पोवार असे या जिगरबाज तरुणाचं नाव आहे. गडहिंग्लज युनायटेडचा प्रतिभावान युवा फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'अभिषेक'ने संतोष ट्रॉफीच्या पर्दापणातच अर्धा डझन गोल करून भारतीय फुटबॉल वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. किंबहुना, त्याच्या निमित्ताने गडहिंग्लज फुटबॉल केंद्राची दखल व्यावसायिक फुटबॉल संघानाही घ्यावी लागली आहे.

कर्नाटकातील विजापूर - गुलबर्गा जिल्ह्यातून अनेक लमाण कुटुंबं उदरनिर्वाहासाठी गडहिंग्लजला आले आहेत. त्यापैकीच एका कुटुंबात त्याचा जन्म झाला, त्याचे शिक्षणही इथेच झाले. म्हणूनच, त्याच्या यशाने लमाण बांधवांसह साऱ्या गडहिंग्लजकरांनाही आनंद झाला आहे.

दरवर्षी दिवाळीत येथील एम.आर.हायस्कूलच्या मैदानावर भरणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धांमुळेच अभिषेकला फुटबॉलची गोडी लागली. त्याची गती लक्षात घेऊन 'गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूल'ने त्याला १० वर्षांचा असताना दत्तक घेतले. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. 

चपळ व काटक अभिषेकने शालेयस्तरापासूनच मैदान गाजवायला सुरवात केली. बॅ. नाथ पै विद्यालय, गडहिंग्लज हायस्कूल या संघांना त्याने एकहाती स्पर्धा जिकूंन दिल्या. चेंडूवरील अफलातून नियंत्रण आणि सतत धावण्याची त्याची क्षमता उपयुक्त ठरली.

बेळगाव युनायटेड संघातूनही त्याने बंगळूर १८ वर्षीय लिगमध्ये गोलचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात बंगळूरच्या किक स्टार्ट एफसीतून त्याने ८ गोल नोंदवले. या कामगिरीमुळेच तो कर्नाटकाकडून संतोष ट्रॉफीसाठी निवडला गेला. 

दिल्ली आणि भुवनेश्र्वर येथे झालेल्या संतोष ट्रॉफी पात्रता व मुख्य फेरीत त्याने कर्नाटकाकडून अर्धा डझन गोल मारले. खेलो इंडिया स्पर्धेतही त्याने पाच गोल करुन संघाला उपविजेतपद मिळवून दिले. यंदा प्रथमच संतोष ट्रॉफी उपांत्य आणि अंतिम सामना रिहाद येथील किंग फहाद आंतरराष्ट्रीय स्टेडिमयवर बुधवारी ( १) होत आहे.

संतोष ट्रॉफीतील  कामगिरीमुळे  केरळ, बंगळूर, कोलकत्ता, चेन्नईतील व्यावसायिक संघानीही 
'अभिषेक'साठी संपर्क साधला आहे. त्यामुळे 'फुटबॉल पंढरी गडहिंग्लज' पुन्हा चर्चेत आली आहे.

पहाटे सराव... दिवसभर काम

गेल्या मे महिन्यापर्यंत अभिषेक आई- वडिलांना खोदकामात मदत करायचा. पहाटे अडीच तास सराव आणि दिवसभर कुटुंबियाना मदत असेच त्याचे वेळापत्रक होते. अंगमेहनतीचे काम करूनही न कंटाळता सातत्याने केलेला सराव त्याला अधिक काटक बनविण्यास कारणीभूत ठरला.

‘अभिषेक'ने यंदा स्वप्नवत कामगिरी केली.गडहिंग्लज युनायटेडच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले. उपात्यंफेरीतही त्याने विजय मिळवावा,हीच अपेक्षा -  मल्लिकार्जून बेल्लद अध्यक्ष- युनायटेड फुटबॉल,गडहिंग्लज

Web Title: Abhishek Powar from Kolhapur left for Saude Arabia for Santosh Trophy national football tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.