आधारकार्ड मजुरांना सक्तीचे
By Admin | Updated: April 8, 2015 00:34 IST2015-04-08T00:25:48+5:302015-04-08T00:34:52+5:30
मग्रारोहयो योजना : मानधनात पारदर्शकता आणण्यासाठी उपक्रम

आधारकार्ड मजुरांना सक्तीचे
गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे मानधन (मजुरी) बँकेत जमा करताना पारदर्शकता यावी, यासाठी या योजनेंतर्गत येणाऱ्या मजुरांना आधारकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे या मजुरांकडून आधारकार्ड काढण्याचे काम सुरू झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. यामध्ये १२० दिवस काम उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिलेच पाहिजेत, असा कायदा आहे. मजूर जेवढे दिवस काम करतील, त्या दिवसाचे मानधन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसे मानधन जमाही केले जाते. मात्र, काही मजुरांचा बँक खाते नंबर चुकीचा असतो. तसेच काहीजणांचे खाते बंद झालेले असते. त्यामुळे संबंधित यंत्रणेला मजुरांच्या खात्यात पैसे जमा करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ासेच यात पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळे खात्यात पैसे जमा करताना पारदर्शकता यावी, यासाठी आता मजुरांना आधारकार्ड सक्तीचे केले आहे. मजुरांनी आधारकार्ड काढून त्याचा नंबर राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेनंबरशी संलग्न करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत मजुरांचे मानधन खात्यात जमा करताना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाहीत.
११ हजार नोंदींत मजुरांजवळ आधारकार्ड नाही
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात तब्बल ६६ हजार २८७ कुटुंबे नोंदणी झाली आहेत. मात्र, गतवर्षी यातील १४ हजार कुटुंबे कामावर हजर होती. त्याची संख्या २१ हजार एवढी आहे. त्यातील ४८ टक्के मजुरांनी आधारकार्ड काढले आहे, तर उर्वरित ११ हजार मजूर आधारकार्डपासून वंचित आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी आधारकार्ड आवश्यक असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी आधारकार्ड काढावे. त्यामुळे संबंधितांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेता येईल.
- अशोक भारती, ‘मग्रारोहयो’चे गटविकास अधिकारी (सिंधुदुर्ग).