तो मला सुखानं जगू देणार नाही, त्यापेक्षा मेलेलं बरं; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:07 IST2023-03-16T13:07:30+5:302023-03-16T13:07:59+5:30
तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तो मला सुखानं जगू देणार नाही, त्यापेक्षा मेलेलं बरं; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील तरुणीने राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नकुसा साऊ बोडेकर (वय १९, रा. ओम गणेश मंडळ, बोंद्रेनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून, जवळच्याच तरुणाने त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यामध्ये तरुणीने केला आहे.
करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोंद्रेनगरातील नकुसा बोडेकर या तरुणीचे नववीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यानंतर ती काही घरांमधील घरकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती. चार दिवसांपूर्वीच ती गगनगिरी पार्क येथील सावत्र आईच्या घरातून बोंद्रेनगरातील घरी आली होती. बुधवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून तिने छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची आई आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निवास पवार आणि मनीषा नारायणकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. रात्री उशिरा याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
सुसाइड नोट मिळाली
आत्महत्या केलेल्या तरुणीच्या हातात पोलिसांना दोन सुसाइड नोट मिळाल्या. मारुती हरी बोडेकर याच्यामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्यानं दिली होती. ‘तो मला सुखानं जगू देणार नाही. त्यापेक्षा मेलेलं बरं. त्याच्यामुळंच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करू नका,’ असा उल्लेख चठ्ठीत केला आहे.
तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल
लाल आणि निळ्या रंगाच्या शाईने तिने दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. लाल रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने मारुती बोडेकर याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझा जीव फक्त त्याच्यामुळेच गेलाय. त्याला शिक्षा द्या; तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल, असा उल्लेख चिठ्ठीत आढळला.
तरुणीच्या आत्महत्येने खळबळ
जवळच्याच तरुणाने त्रास दिल्याने तरुणीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी बोंद्रेनगर परिसरात तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली होती.