Kolhapur: शेतमजुरांना चहा द्यायला गेला, मधमाश्यांनी अचानक हल्ला केला; तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:01 IST2026-02-12T17:00:55+5:302026-02-12T17:01:34+5:30
‘विकू’च्या अकाली जाण्याने लिंगनूरकर हळहळले

Kolhapur: शेतमजुरांना चहा द्यायला गेला, मधमाश्यांनी अचानक हल्ला केला; तरुणाचा मृत्यू
गडहिंग्लज : प्रेमळ स्वभाव, हसतमुख, भेटेल त्यांच्याशी आदराने बोलून मने जिंकणाऱ्या ‘विकू’च्या अकाली जाण्याने लिंगनूरकर हळहळले. शेतमजुरांना चहा द्यायला गेलेल्या ‘विकू’वर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला अन् घात झाला. विकास काशिनाथ घुगरे (वय २९, रा. लिंगनूर कानूल, ता. गडहिंग्लज) असे दुर्देवी मृत तरुणाचे नाव आहे.
ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, सातवीनंतर शाळा सोडलेला विकास शेतीत रमला होता. अलीकडे त्याने गोठा प्रकल्पात जातीवंत गायी-म्हशी बाळगल्या होत्या. घरच्यांबरोबरच गावकरीही त्याला प्रेमाने ‘विकू’ म्हणूनच हाक मारत.
मंगळवारी (दि. १०) दुपारी चारच्या सुमारास तो शेतात कामाला आलेल्या मजूर महिलांना चहा देण्यासाठी गेला होता. भर उन्हात उठलेल्या आग्या मोहळातील मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, बुधवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न
शेतात चहा पिताना मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्यामुळे तो चक्कर येऊन जागीच कोसळला. घाबरलेल्या शेतमजूर महिला आरडाओरडा करत सैरावैरा पळाल्या. त्यांच्या आवाजाने शेतवडीतील नागरिक व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.
कुटुंबीयांना धक्का
‘गोकुळ’तर्फे सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकाला देण्यात येणारा ‘गोकुळ श्री’चा मान त्याचे वडील काशिनाथ यांनी दोनदा पटकाविला आहे. गोठ्याचे व्यवस्थापन ‘विकास’च करत होता. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.