Kolhapur Crime: जुन्या पार्टीतील वादाचा सूड नशेतच काढला, हल्लेखोर स्वत:हून पोलिसांत हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:13 IST2025-04-25T12:11:11+5:302025-04-25T12:13:36+5:30
कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी आंबा घाटात झालेल्या मारहाणीच्या रागातून नरेंद्र राजाराम साळोखे (वय ३४, रा. नाथागोळे तालीम, शिवाजी पेठ, ...

Kolhapur Crime: जुन्या पार्टीतील वादाचा सूड नशेतच काढला, हल्लेखोर स्वत:हून पोलिसांत हजर
कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी आंबा घाटात झालेल्या मारहाणीच्या रागातून नरेंद्र राजाराम साळोखे (वय ३४, रा. नाथागोळे तालीम, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याने बुधवारी (दि. २३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत प्रशांत भीमराव कुंभार (३८, सध्या रा. देवकर पाणंद, मूळ रा. निवृत्ती चौक, शिवाजी पेठ) याचा चाकूने भोसकून खून केल्याचे जुना राजवाडा पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. खुनानंतर हल्लेखोर साळोखे हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला. न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाच्या आठ ते दहा तरुणांनी संध्यामठ कमानीजवळ प्रणाली हॉल येथे पार्टीचे आयोजन केले होते. रात्री उशिरा पार्टीच्या ठिकाणी प्रशांत कुंभार पोहोचला. त्यावेळी दारूच्या नशेतील नरेंद्र साळोखे आणि कुंभार या दोघांमध्ये वाद झाला. दोन वर्षांपूर्वी आंबा घाटात झालेल्या वादाचा राग मनात धरून साळोखे याने कुंभार याला पार्टीच्या ठिकाणी येण्यास विरोध केला. तू कशाला इथे आला आहेस. इथून निघून जा, असे म्हणत तो प्रशांतच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी कांदे कापण्यासाठी आणलेल्या चाकूने त्याने प्रशांतच्या पोटात डाव्या बाजूने भोसकले. दोघांमधील झटापट पाहून इतर तरुणांनी त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
गंभीर जखमी अवस्थेतील प्रशांतला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. फुफ्फुसाला झालेली जखम आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळाने हल्लेखोर साळोखे हा स्वत:हून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक विशाल पाटोळे यांच्यासह जुना राजवाडा पोलिस संध्यामठ आणि सीपीआरमध्ये पोहोचले होते.
दोघेही अनेक वर्षांपासूनचे मित्र
प्रशांत हा संगणक, प्रिंटर दुरुस्तीचे काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील असा परिवार आहे. प्रशांत आणि हल्लेखोर नरेंद्र हो दोघे अनेक वर्षांपासून मित्र होते. नरेंद्रचे लग्न झालेले नाही. जुन्या वादाचा राग आणि दारूच्या नशेत त्याने मित्रालाच संपवले.
मित्रांनी हल्लेखोरास चोपले
मारहाणीचा प्रकार घडताच पार्टीतील मित्रांनी हल्लेखोर नरेंद्र याला चोप दिला. त्यानंतर जखमी प्रशांतला दुचाकीवर घेऊन ते सीपीआरमध्ये पोहोचले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ गेल्याने प्रशांतचा मृत्यू झाला होता.
दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त
प्रशांत कुंभार याच्या कमाईवर त्याचे घर चालत होते. हल्लेखोर नरेंद्र साळोखे हा एका बँकेच सफाई कामगार म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झाले नसून, घरात आई, वडील त्याच्यावरच अवलंबून आहेत. एकाचा खून झाला, तर दुसरा पोलिसांच्या कोठडीत गेला. यामुळे दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली.