Kolhapur Crime: पोलिस बदल्यांसाठी फसवणूक; सांगलीतील तरुणास अटक
By उद्धव गोडसे | Updated: February 11, 2025 12:39 IST2025-02-11T12:37:21+5:302025-02-11T12:39:53+5:30
बँक खाती गोठवली, आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न होणार

Kolhapur Crime: पोलिस बदल्यांसाठी फसवणूक; सांगलीतील तरुणास अटक
कोल्हापूर : हायवे ट्रॅफिक शाखेकडे बदली करून देण्याचे आमिष दाखवून सहा पोलिसांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात संतोष यशवंत खरात (वय २७, रा. सांगलीवाडी, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मंगळवारी (दि. ११) पहाटे सांगलीवाडीतून अटक केली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही साथीदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली असून, आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे.
जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिसांची १३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मनोज सबनीस याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सांगलीवाडी येथील संतोष खरात याचे नाव समोर आले. पोलिसांनी मंगळवारी पहाटे त्याच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली.
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सबनीस याने पोलिसांकडून घेतलेले पैसे खरात याच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यामुळे पोलिसांनी खरात याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही संशयिताचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. अटकेतील सबनीस आणि खरात यांच्या चौकशीतून गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील रॅकेटचा उलगडा होऊ शकतो.