Kolhapur: मोबाइल जास्त वापरू नकोस म्हटल्याचा राग, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:57 IST2025-08-26T18:57:04+5:302025-08-26T18:57:27+5:30
किरण विलास जाधव यांना राजवर्धन हा एकुलता मुलगा होता

संग्रहित छाया
नवे पारगाव : घुणकी (ता. हातकणंगले) येथील राजवर्धन किरण जाधव (वय २०) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, घुणकी येथील किरण विलास जाधव यांना राजवर्धन हा एकुलता मुलगा होता. तो बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या आयटीआयचे शिक्षण घेत होता. वडील किरण यांनी राजवर्धनला मोबाइल जास्त वापरू नकोस, असे म्हटल्याचा राग होता.
रागाच्या भरात राजवर्धन याने ओढ्याच्या शेजारी असलेल्या झाडाच्या फांदीला फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २५) सकाळी निदर्शनास आली. रमेश विलास जाधव यांनी याबाबतची वर्दी वडगाव पोलिसात दिली.
नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याच्या मागे आई, वडील असा परिवार आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मोठे व सुतार तपास करीत आहेत.