दुचाकीवर बसताना चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:54 IST2025-12-30T12:53:40+5:302025-12-30T12:54:37+5:30
मित्रासोबत पाहुण्यांकडे जेवायला गेल्यानंतर परत येताना घडली घटना

दुचाकीवर बसताना चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना
कोल्हापूर : मित्रासोबत पाहुण्यांकडे जेवायला गेल्यानंतर परत येताना दुचाकीवर बसताना चक्कर येऊन पडल्याने किरण अनिल पाटील (वय. २९, रा. माळवाडी, पाचगाव, ता. करवीर) याचा मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी (दि. २८) रात्री सव्वानऊच्या सुमारास मरळी (ता. करवीर) येथे घडला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पाटील हा रविवारी सायंकाळी मित्रासोबत मरळी येथे पाहुण्यांकडे जेवायला गेला होता. जेवण आटोपून परत येताना पाहुण्यांच्या घरासमोर मित्राच्या दुचाकीवर मागे बसतानाच त्याला चक्कर आली. मोबाइलवर बोलतच तो जमिनीवर कोसळला.
त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तो गवंडी काम करीत होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या पश्चात आई, वडील, चुलते, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.