Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:52 IST2025-03-07T11:50:58+5:302025-03-07T11:52:09+5:30
अपघात सीसीटीव्हीत कैद

Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार
कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला पाठीमागून येत डंपरने चिरडले. दोन्ही चाके महिलेच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. मुगाबाई शंकर निगडे (वय ८४, रा. नागदेववाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर डंपरचालकाने पलायन केले. चालकाचे नाव सचिन माने (वय ३७, रा. कोतोली, ता. पन्हाळा) असे आहे.
नागदेववाडी (ता. करवीर) येथील मुगाबाई निगडे या बालिंगा येथे बँकेत निघाल्या होत्या. बालिंगा येथे मुख्य चौकात रस्त्याच्या एका बाजूने चालत जात होत्या. याचवेळी दुपारी पावणेबारा वाजता दोनवडे येथून काँक्रीटचा मिक्सर डंपर (एमएच ०९ एफएल ०४४४) कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. एवढ्यात या डंपरचालकाने मागून थेट धडक दिल्याने मुगाबाई यांच्या अंगावरून डंपरचे पुढील व मागील चाक गेले. यामुळे त्या जागीच ठार झाल्या. या घटनेनंतर चालकाने पलायन केले. या घटनेची माहिती करवीर पोलिसांत देण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अपघात सीसीटीव्हीत कैद
चालक बेदरकारपणे डंपर चालवत होता. ही सर्व घटना शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.