Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:11 IST2024-08-26T12:09:55+5:302024-08-26T12:11:25+5:30
भीषण अपघतात दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत गेली होती

Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार
शिये: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शिये ता. करवीर फाटा येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी सचिन ऊर्फ पोपट कुमार चौगले (वय ४० रा. किणी ता. हातकणंगले ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार र्सोरभ संजय साळुंखे (३०, रा. हरिपुजा पुनम नगर कोल्हापूर) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारच्या सुमारास हॉटेल दुर्गामाता समोर हा अपघात झाला. या भीषण अपघतात दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत गेली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन चौगले हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत कामाला होता. रविवारी दुपारची शिप्ट असल्याने ते कामावर जाण्यासाठी शिये फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग ओलाडत होता. त्याचवेळी कोल्हापूरहुन सादळे मादळेकडे जाणाऱ्या सौरभ साळुंखे याच्या भरधाव दुचाकीने सचिन चौगले यांना जोराची धडक झाली. या धडकेत सचिन याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.
सौरभ साळुंखे हा सिव्हिल इंजीनियर असून त्यांच्या वडीलांचा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील हनुमाननगर येथे ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यांचा सादळे मादळे येथे फार्म हाऊस आहे. त्याचे नुतनीकरणाचे काम चालू असल्याने सौरभ हा कोल्हापूरहुन सादळे मादळेकडे मोटारसायकलवरून निघाला होता. या अपघातात सौरभ साळुंखे हा गंभीर जखमी झाला . त्याला उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.