Kolhapur Crime: लेबल प्रवरानगरचे, तयार केली गोव्यात, विक्री नागपूरला; छापा टाकून ४० लाखांची दारु जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:58 IST2026-01-20T12:58:14+5:302026-01-20T12:58:38+5:30

दोघांना अटक, उत्पादन शुल्कची कारवाई; नागपुरातील खरेदीदाराचा शोध सुरू

A team of the State Excise Department laid a trap and seized country liquor worth Rs 40 lakhs being manufactured in Goa and sent to Nagpur | Kolhapur Crime: लेबल प्रवरानगरचे, तयार केली गोव्यात, विक्री नागपूरला; छापा टाकून ४० लाखांची दारु जप्त 

Kolhapur Crime: लेबल प्रवरानगरचे, तयार केली गोव्यात, विक्री नागपूरला; छापा टाकून ४० लाखांची दारु जप्त 

कोल्हापूर : प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर (ता. राहता, जि. अहमदनगर) असे लेबल असलेली आणि गोव्यात तयार करून नागपूरकडे पाठवली जाणारी ४० लाखांची देशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडली. दारूची तस्करी करणारा ट्रकचालक सलीम खय्युम शेख (सध्या रा. यवतमाळ, मूळ रा. आदिलाबाद, तेलंगणा) आणि क्लीनर सूरज तेजराव सावंग (रा. यवतमाळ) यांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. १८) रात्री देवगड-निपाणी राज्यमार्गावर आणूर रोड, बस्तवडे फाटा येथे केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड ते निपाणी मार्गावरून दारूची तस्करी होणार असल्याची टीप कागल येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने आणूर रोड येथे सापळा रचून संशयित ट्रक पकडला. झडतीदरम्यान ट्रकमध्ये पाण्याच्या बाटल्यांच्या ५०० बॉक्समागे देशी दारूचे एक हजार बॉक्स लपविल्याचे लक्षात आले.

दारूच्या बॉक्सवर प्रवरानगर येथील डिस्टिलरीचे लेबल होते. गोव्यात तयार केलेली दारू नागपूरला घेऊन जात असल्याची माहिती ट्रकचालक सलीम शेख याने दिली. पथकाने चालक आणि क्लीनरला अटक करून ४० लाखांची देशी दारू, एक लाख आठ हजारांचे पाण्याचे बॉक्स, २० लाखांचा ट्रक आणि ६१ हजारांचे दोन मोबाइल असा ६१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

निरीक्षक शंकर आंबेरकर, प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक एस.आर. नायकुडे, पी.व्ही. नागरगोजे, सहायक दुय्यम निरीक्षक डी.बी. गवळी, जवान सचिन काळेल, लक्ष्मण येडगे, केतन दराडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

नागपुरातील खरेदीदाराचा शोध सुरू

महाराष्ट्रातील लेबलचा गैरवापर करून गोव्यातून देशी दारू मागविणारा नागपूरचा खरेदीदार कोण? याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. त्यांनी बनावट लेबलची छपाई कुठे केली? गोव्यात कोणत्या कंपनीने दारू तयार करून दिली? या तपासातून दारूची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी वर्तवली.

बाहेर पाण्याच्या बाटल्या, आत दारूचे बॉक्स

दारूची तस्करी नजरेत येऊ नये यासाठी ट्रकच्या हौदात बाहेरच्या बाजूला पाण्याच्या बाटल्यांचे ५०० बॉक्स ठेवले होते. आतल्या बाजूला दारूच्या एक लाख बाटल्यांचे एक हजार बॉक्स लपवल्याचे पथकाच्या तपासात स्पष्ट झाले.

Web Title : फर्जी लेबल वाली शराब जब्त: गोवा निर्मित, नागपुर जा रही, ₹40 लाख मूल्य

Web Summary : कोल्हापुर पुलिस ने गोवा में बनी, नागपुर जा रही ₹40 लाख की फर्जी लेबल वाली शराब जब्त की। दो गिरफ्तार। शराब को ट्रक में पानी की बोतलों के पीछे छिपाया गया था। नागपुर के खरीदार और फर्जी लेबल के स्रोत का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : Fake-Labeled Liquor Seized: Goa-Made, Nagpur-Bound, ₹40 Lakh Worth

Web Summary : Kolhapur police seized ₹40 lakh worth of fake-labeled liquor made in Goa, destined for Nagpur. Two arrested. The liquor was hidden behind water bottles in a truck. Investigation is ongoing to find the Nagpur buyer and the source of the fake labels.