Kolhapur: टीईटी पेपरफुटीतील आरोपींचा नेपाळच्या सीमेपर्यंत शोध; दोन्ही आरोपींचा थांगपत्ता नाही, तपास पथक परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:06 IST2025-12-10T18:05:51+5:302025-12-10T18:06:15+5:30
तपासात सायबर तज्ज्ञांची मदत

Kolhapur: टीईटी पेपरफुटीतील आरोपींचा नेपाळच्या सीमेपर्यंत शोध; दोन्ही आरोपींचा थांगपत्ता नाही, तपास पथक परतले
कोल्हापूर : टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक बिहारमध्येनेपाळच्या सीमेपर्यंत जाऊन आले. पटना आणि सिवान जिल्ह्यात सलग सहा दिवस शोध घेऊनही रितेशकुमार आणि मोहम्मद या आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. २० नोव्हेंबरपासून आरोपी त्यांच्या गावाकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक मंगळवारी (दि. ९) कोल्हापुरात परत आले.
टीईटीचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी कराड तालुक्यातील संदीप आणि महेश गायकवाड या बंधूंना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पेपर पुरविणारे रितेशकुमार आणि मोहम्मद यांची नावे समोर आली होती. ते दोघे मूळचे बिहारचे असल्याने पोलिसांचे एक पथक शोधासाठी बिहारला गेले होते.
३० नोव्हेंबरला कोल्हापुरातून बाहेर पडलेले पथक दोन डिसेंबरला पटना येथे पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पटना येथील एका शाळेच्या वसतिगृहात रितेशकुमार आणि मोहम्मद यांचा शोध घेतला. मात्र, २० नोव्हेंबरपासूनच तो गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिवान जिल्ह्यात रितेशकुमार याच्या मूळ गावी नेपाळच्या सीमेपर्यंत पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र, आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. आठवडाभर शोध घेऊन अखेर पथक परतले.
आणखी काही एजंटची चौकशी
तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुजीत क्षीरसागर यांनी गेल्या चार दिवसांत आणखी आठ संशयितांची चौकशी केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश गायकवाड याच्या मोबाइल कॉल डिटेल्सवरून संशयितांची माहिती पोलिसांनी मिळाली. ते एजंट असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करणार असल्याची माहिती तपास अधिकारी क्षीरसागर यांनी दिली.
तपासात सायबर तज्ज्ञांची मदत
मुख्य आरोपी महेश गायकवाड याने अटकेच्या भीतीने त्याचा मोबाइल रिसेट केला. यामुळे बरेच मोबाइल नंबर, मेसेज, मेल, व्हॉट्सॲप मेसेज डिलीट झाले आहेत. डिलीट झालेली सर्व माहिती मिळविण्यासाठी सायबर तज्ज्ञांनी मदत घेतली जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.