Kolhapur: प्राध्यापिकेच्या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवडचा संशयित ताब्यात, ४२ लाख खात्यावर वर्ग; चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:42 IST2025-06-02T13:42:09+5:302025-06-02T13:42:20+5:30
डोंगरे यांनी भरलेल्या १० बँक खात्यांमधील रक्कम पुढे १३० खात्यांमध्ये वर्ग

Kolhapur: प्राध्यापिकेच्या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवडचा संशयित ताब्यात, ४२ लाख खात्यावर वर्ग; चौकशी सुरु
कोल्हापूर : सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (वय ७५, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना ३ कोटी ५७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले. डोंगरे यांनी भरलेली ४२ लाखांची रक्कम पिंपरी चिंचवड येथील ३२ वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात जमा झाली होती. हे खाते नेमके कोण चालवत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांच्याकडून ३ कोटी ५७ लाख रुपये उकळले. यातील ४२ लाखांची रक्कम जमा झालेल्या खातेधारकाचा शोध घेण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले. संबंधित खाते पिंपरी चिंचवड येथील तरुणाच्या नावे आहे. पोलिसांचे पथक रविवारी सकाळी त्याला घेऊन कोल्हापुरात आले.
त्याच्या खात्यावर जमा झालेली रक्कम ऑनलाइन पद्धतीने पुढे वेगवेगळ्या ७० खात्यांमध्ये वर्ग झाली आहे. ही रक्कम त्याने वळवली की अन्य कोणी वळवली याची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणावर यापूर्वी अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१३० खात्यांची तपासणी
डोंगरे यांनी भरलेल्या १० बँक खात्यांमधील रक्कम पुढे १३० खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे दिसत आहे. या खात्यांचा वापर कधीपासून सुरू आहे? खातेदार कोण आहेत? खात्यांवर किती रकमांचे व्यवहार झाले आहेत? खात्यांच्या केवायसी झाल्या आहेत काय? याची तपासणी सुरू आहे. संशयास्पद व्यवहार असलेली बँक खाती गोठवण्याबद्दल बँकांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.