Kolhapur: बापरे... गर्दीतच उसाची ट्रॉली ट्रॅक्टरपासून झाली वेगळी, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:33 IST2025-11-27T12:31:48+5:302025-11-27T12:33:55+5:30
या घटनेने पुन्हा एकदा शहरातील ऊस वाहतुकीचा धोका ऐरणीवर आला

Kolhapur: बापरे... गर्दीतच उसाची ट्रॉली ट्रॅक्टरपासून झाली वेगळी, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
कोल्हापूर : दिवसा शहरातून ऊस वाहतुकीला परवानगी नसतानाही बुधवारी (दि. २६) दुपारी चारच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी ताराराणी चौकात आलेला ट्रॅक्टर भरलेल्या ट्रॉलींपासून वेगळा होऊन दुभाजकावर गेला. प्रसंगावधान राखून वाहतूक पोलिस आणि काही नागरिकांनी चाकांना दगड लावून ट्रॉली जागेवरच थांबवल्या. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी दिवसा शहरातून ऊस वाहतूक बंद केली आहे. तरीही काही वाहतूकदार ऐन गर्दीच्या वेळी प्रमुख मार्गांवरून वाहतूक करतात. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास तावडे हॉटेलच्या दिशेने एक ट्रॅक्टर उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन ताराराणी चौकात पोहोचला. प्रवेश नसल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला अडवून परत तावडे हॉटेलच्या दिशेने जाण्याची सूचना केली.
त्याचवेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला जोडणाऱ्या डाबरची पिन निघाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर युटर्न घेऊन गीता मंदिरासमोरील दुभाजकावर गेला. पोलिसांसह नागरिकांनी तातडीने ट्रॉलीच्या चाकांना दगड लावून दोन्ही ट्रॉली जागेवरच थांबवल्या. दुभाजकावरील ट्रॅक्टर बाजूला घेतला. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील ऊस वाहतुकीचा धोका ऐरणीवर आला आहे.
चालकाला आली चक्कर
ताराराणी चौकात पोहोचताच ट्रॅक्टर चालकाला चक्कर आली. पोलिस त्याला ट्रॅक्टर वळवून तावडे हॉटेलच्या दिशेने जायला सांगत होते. मात्र, चक्कर आल्याने गोंधळलेल्या चालकाने अचानक ट्रॅक्टर पुढे घेताना तो ट्रॉलींपासून वेगळा झाला. काही वेळातच ट्रॉली बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.