शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 23:28 IST2025-08-11T23:27:25+5:302025-08-11T23:28:24+5:30
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले.

शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्यापीठातील भूगोल विभागात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले. वसतिगृहातील रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. गायत्री रेळेकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री रेळेकर ही विद्यार्थिनी भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिकत होती. गावावरुन परतल्यानंतर गायत्रीने आत्महत्या केली. या घटनेनंतर शिवाजी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक तसेच गायत्रीच्या मैत्रिणींचा वसतिगृहासमोरचा आक्रोश हा हदय पिळवटून टाकणारा होता.
गायत्री रेळेकर ही विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील एका रुममध्ये राहत होती. तिच्यासोबत इतर दोन मुलीही राहत होत्या. गायत्री ही तीन दिवस तिच्या गावी गेली होती. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ती सांगलीवरून कोल्हापूरमध्ये पोहोचली. तसा फोन तिने तिच्या वडिलांना केला.
अन्य मैत्रिणी गायत्रीच्या रुममध्ये पोहोचल्या. त्यावेळी गायत्रीच्या रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. फोन केल्यानंतर रिंग वाजत होती, पण तो उचलला नाही. त्यावर शंका आल्याने त्या मैत्रिणींनी खिडकीतून डोकावल्यानंतर त्यांना धक्काच बसला. रुमच्या आतमध्ये गायत्रीने आपल्या ओढणीने गळफास लावून घेतला होता.