Kolhapur Crime: अर्ध्या गुंठ्यासाठी आई-वडिलांचे डोके ठेचले, नसाही कापल्या; हुपरीत माथेफिरु मुलाचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:26 IST2025-12-20T12:25:51+5:302025-12-20T12:26:36+5:30
स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या माथेफिरू मुलास अटक

Kolhapur Crime: अर्ध्या गुंठ्यासाठी आई-वडिलांचे डोके ठेचले, नसाही कापल्या; हुपरीत माथेफिरु मुलाचे कृत्य
हुपरी (जि. कोल्हापूर) : घराची वाटणी करण्याच्या कारणावरुन माथेफिरू मुलाने बांबूच्या दांडक्याने डोक्यावर प्रहार, विळ्याच्या पात्याने मान आणि काचेच्या तुकड्याने हाताच्या नसा कापून जन्मदात्या आई-वडिलांचा निर्घृण खून केला. नारायण गणपतराव भोसले (वय ८२), विजयमाला नारायण भोसले (७०) असे वयोवृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी सुनील नारायण भोसले (वय ४८, रा.हुपरी, ता.हातकणंगले) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे हुपरीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हुपरीतील महावीरनगर येथे नारायण भोसले व त्यांच्या पत्नी विजयमाला हे दोघेही राहत होते. त्यांचे मुलगे चंद्रकांत व संजय हे व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात तर सुनिल हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहतो. चंद्रकांत व संजय हे दोघेही आई-वडीलांना भेटायला अधूनमधून गावी येत असत.
दरम्यान, सुनिल हा नेहमी किरकोळ कारणावरून भांडण काढून आई-वडीलांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे. महिन्यापूर्वीच त्याने काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, माफी मागितल्याने त्याच्याविरूद्ध त्यांनी तक्रार दिली नव्हती.
गुरूवारी (१९) रात्री नारायण हे पहिल्या खोलीत तर विजयमाला या मागील खोलीत झोपल्या होत्या. पहाटे दोघेही साखरझोपेत असतानाच सुनिलने बांबूच्या दांडक्याने वडीलांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर काचेच्या तुकड्याने हाताच्या नसा कापल्या त्यानंतर मागील खोलीत झोपलेल्या आईच्या डोक्यावरही दांडक्याने प्रहार केला, विळ्याने गळा चिरला व उजव्या हाताच्या मनगटाजवळची नस काचेने कापली. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मागील खोलीसह संडास बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे डाग पडले होते.
दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, उपअधिक्षक धीरजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक विक्रम गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलगा संजय भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे अधिक तपास करीत आहेत.
आईची समजूत काढली
मंगळवारी (१६) सुनिलने आईकडे खुन्नसने बघून शड्डू ठोकला व शिवीगाळ केल्याचे विजयमाला यांनी मुलगा संजयला सांगितले होते. मात्र, त्याच्याकडे लक्ष देवू नको असे सांगून त्याने आईची समजूत काढली होती.
स्वत: पाेलिस ठाण्यात हजर
११२ क्रमांकावर फोन करून मी आई-वडिलांचा खून केला आहे, अशी माहिती सुनीलने स्वत: पोलिसांना दिली आणि ठाण्यात हजर झाला. वडिलांच्या डोक्यावर दांडक्याने प्रहार करताना शोकेसची काच फुटली. त्याच काचेने त्याने आई-वडिलांच्या हाताच्या नसा कापल्या. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आईच्या अंथरूणात तुटलेले मंगळसूत्र आणि बांगड्यांचा खच पडला होता.
बघ्यांनाही धमकी
शांत डोक्याने आई-वडीलांचा खून केल्यानंतर खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनिलने बांबूचे दांडके, विळ्याचे पाते बाथरूममध्ये धुतले व आपल्या शेडजवळील दरवाजाच्या भिंतीलगत ठेवले. त्यानंतर गेट बंद करून घराबाहेर निर्वीकारपणे बसला होता. कुणी घराजवळ आल्यास त्यांना दगड फेकून मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घराजवळ जायला कुणी धाडस करत नव्हते.
चुलत वहिणीलाही फरशी फेकून मारली
पहाटे पावणे सहाच्या सुमारास घरात आरडाओरडा ऐकू येत असल्यामुळे शेजारी राहणाºया चुलत वहिणी राजमाता यांनी घरात भांडण सुरू असल्याचे संजय यांना फोनवरून कळवले. त्यानंतर नेमके काय घडले हे बघायला गेलेल्या राजमाता यांनाही सुनिलने फरशीचा तुकडा फेकून मारला.
आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा
सुनिलचे बंधू संजय हे सोनारकाम करतात. व्यवसायानिमित्त ते भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ येथे राहतात. तर ज्येष्ठ बंधू चंद्रकांत हे भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे राहतात. घटनेची माहिती मिळताच दोघेही कुटुंबियांसह हुपरीत पोहचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई-वडीलांना पाहून त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अबालवृद्धांनाही हुंदका
भोसले कुटूंबियांचा चरितार्थ चांदी उद्योगावरच चालत असे. दरम्यान, चंद्रकांत याने पिंपळगावमध्य तर संजय याने गारगोटीमध्ये ज्वेलर्सचे दुकान सुरू केले. सुनिलचे वागणे विचीत्र असल्यामुळे त्याची पत्नी मुलाबाळांसह माहेरी बेळगावला राहते. त्यामुळे खाजगी नोकरी करत तो एकटाच राहत होता. नारायण भोसले यांना परिसरातील अबालवृद्ध काका म्हणून हाक मारत. विवाह जुळवून त्यांनी अनेकांचे संसार फुलविले. मात्र, पोटच्या मुलानेच त्यांची जीवनयात्रा संपवली. त्यामुळे घटनास्थळी जमलेल्या अबालवृद्धांनाही हुंदका आवरत नव्हता.