Kolhapur: भरधाव स्कूलबसने दुचाकीस्वाराला पाच फूट फरफटत नेले, तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:10 IST2025-07-18T16:09:47+5:302025-07-18T16:10:10+5:30
बसला वेळेवर पोहोचण्यासाठी काही चालकांची स्पर्धा

Kolhapur: भरधाव स्कूलबसने दुचाकीस्वाराला पाच फूट फरफटत नेले, तरुण जखमी
कोल्हापूर : सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवरील आपटेनगर चौकात वर्दळ सुरु होती. त्याच वेळी सानेगुरुजी वसाहत रोडवरून आलेल्या एका शाळेच्या भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून एक तरुण जखमी झाला. त्याच्या मोटारसायकलचे नुकसान झाले.
फुलेवाडी रिंग रोड, राधानगरी रोड, सानेगुरुजी वसाहत रोडवरून येणारी वाहतूक मुख्य आपटेनगर चौकातून अन्यत्र जाते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणच्या एसटी बसस्टॉपसाठी प्रवासी थांबतात. तसेच इंजिनिअरिंग, वैद्यकीयसह स्कूल बसेसची वर्दळही या ठिकाणी अधिक असते. चौकातच मोठे खड्डे पडले आहे. तर मोठ्या दहा चाकी ट्रकला वळण घेताना मोठी कसरत करावी लागते. ट्रॅक वळविताना वाहतूक थांबते.
शाळेच्या बसला वेळेवर पोहोचण्यासाठी काही चालकांची स्पर्धा सुरु असते. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव आलेल्या बसने दुचाकीस्वाराला उडविले. सुमारे पाच फूट फरफटत नेले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसची प्रतीक्षा करत असलेले प्रवासी, व्यावसायिक, मॉर्निंग वॉकचा ग्रुप याठिकाणी जमले. जोरदार दिलेल्या धडकेत तो तरुण पाच मिनिटे तसाच रस्त्यावर पडून राहिला. अखेर नागरिकांनी त्या बसचालकाला धारेवर धरले. या प्रकरणी करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
अनर्थ टळला
या चौकात एका बेकरी समोरच एसटी, केएमटीचा थांबा आहे. त्याठिकाणी २० हून अधिक शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक थांबले होते. बसचा वेग अधिक असता तर मोठी दुर्घटना घडली होती.