Kolhapur- भरधाव कारची झाडाला धडक, धामोडमधील तरुण ठार; सौंदत्तीनजीक झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 17:10 IST2023-09-15T15:11:43+5:302023-09-15T17:10:12+5:30
कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

Kolhapur- भरधाव कारची झाडाला धडक, धामोडमधील तरुण ठार; सौंदत्तीनजीक झाला अपघात
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार झाडावर आदळल्याने भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. धामोड येथील मोटार मेकॅनिक अजित चंद्रकांत धनवडे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. कर्नाटकात ट्रॅक्टर खरेदीसाठी गेले असता परताना मुनवळी नरगुंद मार्गावर आज, शुक्रवारी सकाळी पहाटे हा अपघात घडला. घटनेची नोंद सौंदती पोलीस ठाण्यात झाली आहे.
उमेश शिवाजी मराठे (वय ३९), कारचालक संतोष सुरज सोनवणे (४० दोघेही राहणार धामोड, ता. राधानगरी) व दत्तात्रय लक्ष्मण बरगे (४०) हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सौंदती सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, कारचालक संतोष सोनवणे हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कोपळ येथे आपल्या कारमधून गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर (रा. केळोशी, खुर्द पैकी कानकेकरवाडी) यांच्यासह मित्र उमेश, दत्तात्रय व अजित या चौघांना घेऊन गेले होते. ते ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या मूळगावी परतत असताना सौंदत्तीपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या नरगुंद मार्गावर आतमटी गावाजवळ चालक संतोष यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारची झाडाला धडक बसली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. यात अजित याच्या छातीवर जोराचा मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर तिघे जखमी झाले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रामदुर्ग सर्कलचे डीएसपी रामनगौडा हटी, सीपीआय जे करणेशगौडा, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन कारच्या मागे असलेल्या ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर यांच्याकरवी अपघातातील जखमी व मृत व्यक्तीची ओळख पटवून कुटुंबियांना संपर्क साधला. मृत अजित यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास सीपीआय जे. करूणेशगौडा करत आहेत. घटनेमुळे धामोड गावावर शोककळा पसरली आहे.