भरधाव टेम्पोने धडक दिल्याने सिग्नल खांब तुटला; नव्या वाशी नाका येथील घटना
By संदीप आडनाईक | Updated: April 1, 2024 00:06 IST2024-04-01T00:05:15+5:302024-04-01T00:06:08+5:30
वाहतूक ठप्प, चालकाला नागरिकांचा चोप

भरधाव टेम्पोने धडक दिल्याने सिग्नल खांब तुटला; नव्या वाशी नाका येथील घटना
कोल्हापूर : कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पोचालकाने धडक दिल्याने नवीन वाशी नाका येथील सिग्नलचा खांब पडला. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. गर्दी केलेल्या संतप्त नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी गर्दीला हटवून कांही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.
कोंबड्यांची वाहतूक करणारा हा टेम्पो राधानगरी येथून पेठवडगावच्या दिशेने निघाला होता. नवीन वाशी नाका येथे चालकाचा ताबा सुटल्याने या भरधाव टेम्पोने थेट सिग्नलच्या खांबालाच धडक दिली. ती इतकी मोठी होती, की सिग्नलचा खांब तुटून खाली पडला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. त्यांनी चालकाला बाहेर काढून बेदम चोप दिला. गर्दीमुळे कांही काळ या परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी गर्दीला हटवून एकेरी वाहतूक सुरू केली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरु होते.