Kolhapur: देवपूजेसाठी पाणी आणायला गेली, घरानजीकच्या विहिरीत बुडाली; संकेश्वरनजीकची दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:42 IST2025-10-28T15:41:49+5:302025-10-28T15:42:12+5:30
शाळकरी मुलीच्या मृत्यूने सीमाभागात हळहळ

Kolhapur: देवपूजेसाठी पाणी आणायला गेली, घरानजीकच्या विहिरीत बुडाली; संकेश्वरनजीकची दुर्घटना
संकेश्वर : देवपूजेसाठी पाणी आणायला गेलेल्या शाळकरी मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने घराशेजारील विहिरीत बुडून मृत्यू झाला. रक्षिता चंद्रकांत खानाई (वय १६, रा. सोलापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. सोमवारी (दि. २७) सकाळच्या सातच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चंद्रकांत खानाई हे कुटुंबीयांसह महाराष्ट्र हद्दीलगत असणाऱ्या सोलापूरच्या शेतवडीत वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी रक्षिता ही संकेश्वर येथील खासगी शाळेत दहावीत शिकत होती. सोमवारी सकाळी देवपूजेसाठी पाणी आणण्यासाठी ती घरानजीकच्या विहिरीवर गेली होती.
त्यावेळी पाय घसरून किंवा तोल जाऊन ती विहिरीत पडली. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. दरम्यान, बराच वेळ झाला तरी रक्षिता घरी न आल्याने घराच्यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी ती विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
‘रेस्क्यू टीम’चे सहकार्य
भरपूर पाणी असल्याने स्थानिकांना विहिरीत रक्षिताचा शोध घेणे अवघड बनले. त्यामुळे गडहिंग्लज येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. राहुल कारंडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिला पाण्यातून बाहेर काढले.
हुशार व एकुलती
रक्षिता ही आई-वडिलांना एकुलती होती. अभ्यासातही अत्यंत हुशार होती. मात्र, तिच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
‘मुत्नाळ’कर हळहळले !
चंद्रकांत खानाई हे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. तसेच त्यांनी अलीकडे गोठा प्रकल्पही सुरू केला आहे. ते कर्नाटकच्या हद्दीत राहत असले त्यांचे दैनंदिन व्यवहार शेजारील महाराष्ट्र हद्दीतील मुत्नाळमध्ये आहेत. या दुर्घटनेमुळे मुत्नाळकरही हळहळले.