Kolhapur: गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला, घटनेने परिसर हळहळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:49 IST2025-09-08T18:48:42+5:302025-09-08T18:49:14+5:30
सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

Kolhapur: गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला, घटनेने परिसर हळहळला
कोल्हापूर : गेली अकरा दिवस घरासमोरच्या सार्वजनिक गणेश मंडळात उत्साहाने वावरल्यानंतर रविवारी सकाळी मंडळातून घरी आलेल्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. करण कृष्णात गायकवाड (वय १४, रा. चाफोडी तर्फ तारळे, ता. राधानगरी) असे मृत मुलाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (दि. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, नववीच्या वर्गात शिकणारा करण हा चाफोडी येथे आई, वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होता. गेली अकरा दिवस तो घरासमोरच्या सार्वजनिक गणेश मंडळात सक्रिय होता. शनिवारी रात्री उशिरा विसर्जन झाल्यानंतर तो घरी आला. रविवारी सकाळी आई, वडील शेतात गेले होते, तर लहान बहीण शेजारी खेळत होती. करण हा मंडळातील साहित्य काढण्यासाठी गेला होता. साडेदहाच्या सुमारास तो घरात आला. काही वेळाने बहीण घरात निघाली असता तिला दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. तिने मंडळातील मुलांना बोलवून दरवाजा उघडण्यास सांगितले.
दरवाजा आतून बंद असल्याने तरुणांनी घराची कौले काढून पाहिले असता करण याने लाकडी वाशाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. मंडळातील कार्यकर्त्यांसह संपूर्ण गाव या घटनेने हळहळले. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.